गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत हे सत्य पचवणे अनेकांना कठिण होत आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना व्हेटिंलेटरवरून काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबत सर्वांनाच दिलासा मिळाला होता.
परंतु, त्यानंतर अचानक शनिवारी (५ फेब्रुवारी) लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. लता यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त समोर येताच अनेकांनी त्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. परंतु, अखेर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. पण लता मंगेशकर रुग्णालयात असताना शेवटच्या काळात काय करत होत्या, याबद्दल व्हॉईसओव्हर आर्टिस्ट हरिश भिमानी यांनी सांगितले आहे.
लता मंगेशकर यांचे भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर यांनी हरीश भिमानी यांना सांगितले की, लतादीदी त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या वडिलांची आठवत काढत होत्या. लता मंगेशकर यांचे वडिल पंडीत दीनानाथ मंगेशकर हे मराठी रंगभूमीचे प्रसिद्ध नाट्यसंगीतकार होते. वडिलांच्या आठवणीत लतादीदी खूपच भावूक राहत असत. तसेच त्या त्यांच्या वडिलांचे रेकॉर्डिंग ऐकत असत आणि ते गाण्याचा प्रयत्न करत असत.
लता मंगेशकर यांची प्रकृती खालावण्याअगोदर शुक्रवारी त्यांनी ईअरफोन्स मागवून घेतले होते. तसेच त्यांना आयसीयूमध्ये मास्क न काढण्यास सांगण्यात आले होते. पण तरीही त्या मास्क काढून वडिलांचे गाणे गुणगुणत असत. लता मंगेशकर त्यांच्या वडिलांचे खूप आदर करत तसेच त्या त्यांना आपले गुरु मानत असत.
हरीश भिमानी यांनी सांगितले की, लता मंगेशकर त्यांच्या गाणी ऐकत नसत. असे करण्यास त्या घाबरत असत. याचे कारण म्हणजे लतादीदी जेव्हा त्यांच्या गाणी ऐकायच्या तेव्हा त्यांना त्यांच्या चुका लक्षात यायच्या. आणि त्यांच्या चुका लक्षात येताच त्यांना खूप वाईट वाटायचे. तसेच त्या म्हणायच्या की, जर मोठमोठ्या संगीतकारांनी माझे गाणी ऐकून त्यातील उणिवा बाहेर आल्यास ते काय विचार करतील, अशी भीती त्यांना नेहमी सतावत असत.
दरम्यान, लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या न्यूमोनिया या आजाराशीही झुंज देत असल्याचे डॉक्टरांद्वारे सांगण्यात आले. तब्बल २७ दिवस रूग्णालयात दाखल राहिल्यानंतर लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साश्रूनयनांनी त्यांचा भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. हा क्षण प्रत्येकासाठी भावूक करणारा होता. लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून देशात दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या :
लता मंगेशकर यांचे खरे नाव होते ‘हेमा’, वडिलांनी ‘या’ कारणामुळे बदलले होते नाव, रंजक आहे किस्सा
‘मी तुझा द्वेष करतो, तू अतिशय वाईट केलंस’, लतादीदींच्या निधनानंतर आनंद महिंद्रा झाले भावूक
VIDEO: विमानतळावरच भांडू लागले मलायका-अरबाज? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले..