Share

पुण्यातील मोठमोठी हॉटेल्स, मंगल कार्यालये महापालिकेने केली जमीनदोस्त; वाचा यामागचे खरे कारण

पुणे महापालिकेकडून अतिक्रमणावरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. शहरातील म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डीपी रोडवरील अतिक्रमित हॉटेल व इतर दुकानांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्यात काही लॉन आणि मंगल कार्यालयांचाही समावेश आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक, कर्मचारी व पोलिस मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले होते. याशिवाय याठिकाणी मोठ्या प्रमाणात बुलडोझर, क्रेन आदी अतिक्रमण यंत्रणा आणण्यात आल्या होत्या.पालिकेच्या या कारवाईमुळे डीपी रोडवरील एकेरी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता.

या रस्त्यावर अनेक छोटी-मोठी हॉटेल्स, लॉन, मंगल कार्यालय आहेत. लग्नासाठी मंगल कार्यालयात पुढील 4-6 महिन्यांचे बुकिंग फुल झाले आहेत, असे असताना अचानक मंगलकार्यालय पाडण्यात आल्याने मंगल कार्यालयाच्या मालकांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यांची स्थिती बिकट झाली आहे.

हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. सायंकाळी येथील हॉटेल्समध्ये पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळपासूनच या हॉटेल्सवर कारवाई सुरू केली. काही स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईची माहिती परिसरातील लोकांना 24 तासांपूर्वी देण्यात आली आणि त्यानंतर आज सकाळी 6 वाजता पालिकेचे पथक या ठिकाणी पोहोचले.

माहितीनुसार, डीपी रोड वरती जी मोठी मोठी हॉटेल्स, मंगल कार्यालये आहेत त्यातील अनेक हॉटेल्स आणि मंगल कार्यालय ही सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आली होती. या हॉटेल आणि मंगल कार्यालयांनी अनेक वर्षांपासून जागेवर ताबा मिळवून अतिक्रमण केलं होतं.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेल्या या जागेवर आता पुणे महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. या कारवाईत डीपी रोडवरील राजाराम पूल ते म्हात्रे पूलपर्यंतचे सर्व हॉटेल्स आणि मंगल कार्यालय पुणे महानगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now