Share

लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली; डझनभर आजारांसोबत किडनी फक्त 20 टक्के कार्यरत…

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांची चारा घोटाळाप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावला. आता निकालानंतर लालू प्रसाद यांची तब्येत ठीक नसल्याचं बोललं जात आहे. सध्या रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रांचीतील विशेष सीबीआय कोर्टाकडून लालू प्रसाद यादव यांना दोरांडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.15 फेब्रुवारी रोजी न्यायालयाकडून लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या पाचव्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.

यावेळी, लालू प्रसाद यादव यांचे वकील देवर्षी मंडल आणि प्रभात कुमार यांनी लालूंना कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयात केली होती की, लालूंचे वय 75 वर्षे झाले आहे. मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही आणि त्यांना शिक्षा सुनावली. या निकालानंतर त्यांची प्रकृती खराब झाली.

सध्या लालू प्रसाद यादव यांच्यावर सात डॉक्टरांचे पथक उपचार करत आहेत. राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयातील डॉक्टर विद्यापती यांना विचारले असता, त्यांनी लालू यांची तब्येत स्थिर पण गंभीर असल्याचं सांगितलं आहे. लालू प्रसाद यादव यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि किडनीसह जवळपास डझनभर आजार आहेत.

लालूंच्या तब्येती बाबत डॉक्टर विद्यापती म्हणाले की, लालू प्रसाद यादव यांचा ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरमध्ये चढ-उतार सुरु आहे. सोमवारी सकाळी लालू प्रसाद यादव यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण 70 मिलीग्राम /डीएल इतकी होती. पण दुपारी त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण वाढून 240 मिलीग्राम /डीएलपर्यंत पोहचले. त्यांची किडनी 20 टक्केंपेक्षा कमी काम करत आहे.

लालू प्रसाद यादव यांचा उपचार करणारे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी डिसेंबर 2021 मध्ये त्यांची किडनी 25 टक्के काम करत असल्याचे सांगितले होते.  लालू प्रसाद यादव यांना कधीही डायलिसिसची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत लालू प्रसाद यादव यांना तुरुंगातील शिक्षा भोगणे कठीण होऊ शकते, असे बोलले जात आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now