कुशल बद्रिके म्हणाला, माझ्या बायकोला माहित नाहीत तेवढे सीक्रेट्स तिला माहित आहेत; जाणून घ्या कोण आहे ‘ती’ व्यक्ती

झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यात येते. शोमधील प्रत्येक कलाकार आपल्या विनोदाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खळखळून हसवतात. या शोमधील कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि श्रेया बुगडे (Shreya Bugade) यांच्या मैत्रीबाबत तर सर्वांनाच ठाऊक आहे. तर नुकतीच कुशलने एक पोस्ट शेअर करत त्या दोघांमधील एका सीक्रेटचा खुलासा केला आहे.

कुशल बद्रिके नुकताच झी मराठी वरील ‘किचन कल्लाकार’ या शोमध्ये पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या शोचे सूत्रसंचालन सध्या श्रेया बुगडे करत आहे. यानिमित्ताने कुशलने एक पोस्ट शेअर करत श्रेया आणि त्याचं एक सिक्रेट उघड केलं. तसेच या पोस्टद्वारे त्याने त्यांच्या बॉन्डबद्दल सांगितलं.

कुशलने लिहिले की, ‘माझ्या बायकोला माहीत नाहीत, तेवढे माझे सीक्रेट्स श्रेया बुगडेला माहित आहेत. त्यामुळे ती अँकर असलेल्या शोवर जाताना काळजात धडधडत होतंच, पण शूटिंगच्या दरम्यान लक्षात आलं की माझं ते धडधडण उगाच नव्हतच’.

‘अँकर म्हणून श्रेया किचन कल्लाकारमध्ये धुमाकूळ घालते. पण प्रत्यक्ष आयुष्यात तिचे किचनमधले प्रताप आम्ही (हवा येऊ द्या ची टीम) आवडीने चघळतो. पण सूड म्हणून ती एक दिवस आम्हाला अशी उघड्यावर पाडेल, असं मात्र वाटलं नव्हतं’.

‘विशेष बाब – या कार्यक्रमासाठी माझी खास तयारी, माझी बायको सुनयना आणि भाऊ कदमची बायको ममता वहिनी यांनी करून घेतली. त्यांनी शिकवलेल्या पदार्थांपैकी एखादी डिश मला बनवायला दिली असती तर कदाचित माझी अब्रू वाचली असती’. कुशलची ही पोस्ट वाचून अनेकांनी त्यावर भरभरून कमेंट केले.

कुशल आणि श्रेया ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन नेहमी धमाल करत असतात. तसेच दोघांची बॉन्डिंगसुद्धा तेवढीच खास असून दोघं खूप चांगले मित्र आहेत. कुशलच्या वाढदिवशी श्रेयाने ‘माझ्या आयुष्यातील जीवनावश्यक’ म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. ‘जीव तोडून एखाद्यावर प्रेम कसं करावं आणि आयुष्य कसं जगावं हे हे त्याच्याकडून शिकले’, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते.

दरम्यान, कुशलने किचन कल्लाकार या शोमध्ये अनेक किस्से ऐकवले. यामध्ये त्याने त्याला खेकडा खाण्याचा एक किस्सा सांगितला. कुशलने म्हटले की, मला खेकडा कसा खायचा हे माहित नव्हतं. पण माझे मित्र विजू माने मला म्हणाले की, तू खा तर… प्रयत्न तर कर.. त्यानंतर मी नांगी घेतली आणि दाताने मोडली. पण नांगीसोबत माझी दाढही मोडली.

महत्त्वाच्या बातम्या :
काश्मिरी पंडितांवर बनलेला चित्रपटाच्या टीमने घेतली मोदींची भेट; चित्रपटाचे कौतूक करत मोदी म्हणाले…
“द काश्मिर फाईल्स’ पाहून ढसाढसा रडली महिला, थेट पकडले दिग्दर्शकाचे पाय; म्हणाली…
‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी विवेक अग्निहोत्रींकडे मागितले ‘एवढे’ रूपये, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा