दाक्षिणात्य अभिनेता स्टायलिश स्टार अल्लू अर्जूनसाठी (allu arjun) ‘पुष्पा’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. तेलुगुसोबत कन्नड, मल्याळम, तमिळ आणि हिंदीमध्येही चित्रपटाला खूप मोठा यश मिळाला. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला तरी अद्याप चित्रपटाची क्रेझ कमी झाली नाही. सगळीकडे सध्या ‘पुष्पा’चीच चर्चा असून यामधील गाणी, अॅक्शन सीन्स, डायलॉग यांचाच बोलबाला दिसून येत आहे. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना अल्लू अर्जूनने खांदा वाकून चालणे आणि दाढीखालून हात फिरवण्याच्या स्टाईलची (allu arjun beard style )कल्पना कशी सुचली, याबद्दल सांगितले.
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अल्लू अर्जूला विचारण्यात आले की, ‘पुष्पा’ चित्रपटात खांदा वाकून चालणे आणि दाढीखालून हात फिरवण्याची स्टाईल प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरली. अशी स्टाईल करण्याची कल्पना कोणाची होती? यावर उत्तर देताना अल्लू अर्जूनने सांगितले की, ‘ही माझी आणि आमच्या दिग्दर्शकांची कल्पना होती. एका अॅक्शन सीनदरम्यान मी मध्येच असं केलं होतं. तेव्हा दिग्दर्शकांनी मला पाहिलं आणि त्यांना ते आवडलं’.
‘त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, आपण चित्रपटात ही स्टाईल वापरू. त्यावर मी खूपच आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलं की, हे करायचं? तेव्हा दिग्दर्शकांनी मला सांगितलं की, ‘हा, जेव्हा तू हे अॅक्शन करत होतास तेव्हा मी तुला स्क्रीनवर पाहिलं आणि ते चांगलं वाटलं’. त्यामुळेच चित्रपटात अनेक ठिकाणी दाढीखालून हात फिरवण्याची स्टाईल वापरण्यात आल्याचे अल्लू अर्जूनने सांगितले.
यावेळी अल्लू अर्जूनने खांदा वाकून चालण्याच्या स्टाईलबद्दल बोलताना सांगितले की, ‘आमचे दिग्दर्शक सांगत होते की, चित्रपटात माझी एक वेगळी युनिक अशी बॉडी लँग्वेज हवी. जे लोकांना आवडेल आणि ते पाहून लोक त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतील. दिग्दर्शकांनी मला म्हटलं होतं की, काहीही कर आणि अशी बॉडी लँग्वेज घेऊन ये. त्यावेळी आम्ही तीन-चार प्रकारे स्टाईल करून बघितलो. पण आम्हाला खांदा वाकून चालण्याची स्टाईल आवडली. आणि आम्ही ते चित्रपटात घेतलं. तसेच हे केवळ तीन तासाचं नाही तर दोन वर्षाची मेहनत आहे. या स्टाईलमुळे अजूनही माझा खांदा दुखतो, असेही अल्लू अर्जूनने यावेळी सांगितले.
दरम्यान, अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ चित्रपट मागील वर्षी १७ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अफाट यश मिळाले. त्यानंतर अमेझॉन प्राईवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. सुरुवातीला तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या दाक्षिणात्य भाषेत चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर संक्रातीच्या मुहुर्तावर हिंदीत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तर ओटीटीवरही हा चित्रपट चांगलाच गाजला.
‘पुष्पा’ हा चित्रपट आंध्रप्रदेशमधील शेषाचलम भागातील जंगलात होणाऱ्या चंदन तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटात अल्लू अर्जूनने पुष्पाराज नावाच्या चंदन तस्कराची भूमिका साकारली आहे. एक सामान्य मजूर चंदन तस्करीच्या साम्राज्याचा मालक कसा होतो, हे या चित्रपटात रंजकपणे दाखवण्यात आले आहे. अल्लू अर्जूनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनुसूया, फहाद फाजिल, सुनील यासारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अभिनेत्री समंथा रूथ प्रभूचेही या चित्रपटात एक स्पेशल आयटम सॉन्ग आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकला नाही ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन? निर्मात्याचा खळबळजनक खुलासा
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनप्रमाणे करत होते लाल चंदनाची तस्करी, ५५ मजुरांसह ३ मोठ्या तस्करांना अटक
सलमानचा फार्म हाऊस गुन्हेगारीचा अड्डा? लहान मुलांची तस्करी, कलाकारांचे मृतदेह; सलमानवर गंभीर आरोप