दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत. आपल्या अभिनय आणि विनोदबुद्धीच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. कित्येक वर्ष त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. अशोक सराफ सध्या चित्रपटात जास्त सक्रिय नसले तरी त्यांच्यासंबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. यादरम्यान त्यांचा एक किस्सा सध्या माध्यमात चर्चेत आहे. हा किस्सा म्हणजे अशोक सराफ यांच्या हातात असणाऱ्या अंगठीबाबतचा. (Ashok Saraf Silver Ring)
अशोक सराफ यांच्या उजव्या हाताच्या बोटात नेहमी एक चांदीची अंगठी असते. त्यावर नटराजाची कोरीव प्रतिमा आहे. १९७४ साली त्यांनी ही अंगठी त्यांच्या बोटात घातली होती. जी आजपर्यंत त्यांनी एकदाही काढली नाही. अशोक सराफ यांच्या मते ती अंगठी त्यांच्यासाठी लकी आहे. ते म्हणतात की, ते काही अंधश्रद्धाळू नाहीत पण त्यांच्याकडे अंगठी आल्यावर त्यांच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. त्यामुळे ते त्या अंगठीला लकी मानतात. हा किस्सा स्वतः अशोक सराफ यांनी सांगितला होता.
दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२० साली अशोक सराफ यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्ताने झी टॉकीजमार्फत फेसबुकवर एका लाईव्ह सेशनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ हे दोघे सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका चाहत्याने अशोक सराफ यांना त्यांच्या हातात नेहमी दिसणारी अंगठी त्यांना कोणी दिली, याबाबत प्रश्न विचारला.
यावर उत्तर देताना अशोक सराफ यांनी सांगितले की, ‘मी काही अंधश्रद्धाळू नाही. पण माझा देवावर विश्वास आहे. आणि मी या अंगठीला लकी मानतो. ही गोष्ट आहे १९७४ सालची. त्यावेळी माझा एक मित्र होता विजय लवेकर नावाचा. तो मेकअपमॅन म्हणून काम करायचा. तसंच त्याचं सोन्याचांदीचं छोटंसं दुकान होतं. एकदा त्याने माझ्याकडे चार चांदीच्या अंगठ्या आणल्या. त्यामधील एक अंगठी त्याने मला घेण्यास सांगितले. त्यामध्ये मी नटराजाची प्रतिमा कोरलेली अंगठी घेतली आणि माझ्या बोटात घातली. ती अंगठी माझ्या बोटात फिट बसली’.
अशोक सराफ यांनी पुढे सांगितले की, ‘ज्यादिवशी मी ही अंगठी माझ्या बोटात घातली त्याच्या तिसऱ्याच दिवशी माझ्यासोबत एक घटना घडली. ते म्हणजे मला ‘पांडू हवालदार’ हा चित्रपट मिळाला. त्यानंतर माझे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर नवीन चित्रपटांची आणि ते चित्रपट हिट होण्याची घोडदौड सुरुच राहिली. याला तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, पण ही अंगठी मी हातातून काढायची नाही, असं मी त्यानंतर ठरवलं होतं. आणि आताही ती अंगठी माझ्या हातात आहे’.
अशोक सराफ यांच्यासाठी ही अंगठी म्हणजे त्यांचं जीव की प्राण असं होतं. पण, एकदा त्यांच्यासमोर अंगठी हातातून काढण्याचा पेच प्रसंग उभा राहिला होता. यासंदर्भात सांगताना त्यांनी म्हटले की, ‘एकदा मला एका चित्रपटात भिकारीची भूमिका साकारायची होती. त्यावेळी माझ्या हातातील चांदीची अंगठी काढणं गरजेचं होतं. पण मला तर ती अंगठी काढायची नव्हती आणि भूमिकेलाही न्याय द्यायचा होता. अशा परिस्थितीत मी एक शक्कल लढवली. मी नटराजाची प्रतिमा असलेली बाजू माझ्या तळहाताकडे फिरवली. आणि केवळ रिंग वरच्या बाजूला केली. त्यामुळे माझ्या हातातून अंगठीही निघाली नाही आणि भूमिकाही योग्यरित्या साकारता आली’.
पती अशोक सराफ यांनी अंगठीबाबत सांगितलेला किस्सा ऐकून निवेदिता सराफ म्हणतात की, ‘मी लग्नात अशोकला सोन्याची अंगठी दिली होती. पण लग्नाच्या काहीच दिवसांनतर त्याने ती अंगठी हरवली. इतर कोणत्याही अंगठ्या त्याने हातात घातल्या तरी त्याच्याकडून ते हरवतात. पण ४६ वर्षापूर्वीची त्याची ही अंगठी अजूनही त्याच्या हातात आहे’.
https://www.facebook.com/watch/?v=285810755796963
महत्त्वाच्या बातम्या :
गंगूबाई काठियावाडी वादाच्या भोवऱ्यात; मुलगा म्हणाला, ‘आई सोशल वर्कर होती फिल्ममध्ये वेश्या दाखवलं’
ऋतिक रोशनच्या कथित गर्लफ्रेंडचे चक्क एक्स पत्नी सुझानने केले कौतुक, म्हणाली, ‘सबा तू सुपर..’
बॉलिवूडची ‘ही’ सुंदर अभिनेत्री दिसली मुंबईच्या रस्त्यांवर कचरा उचलताना, व्हिडीओ झाला व्हायरल