बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार बप्पी लहरी (Goldman Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून ते एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. तसेच मागील एक महिन्यापासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
बप्पी लहरी यांचं बॉलिवूड संगीत क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ५०० पेक्षा अधिक गाण्यांना संगीत दिलं आहे. सिनेसृष्टीत त्यांना बप्पी दा या नावाने ओळखलं जात होतं. याशिवाय त्यांना गोल्डमॅन म्हणूनही ओळखलं जात होतं. याचं कारण म्हणजे बप्पी दा त्यांच्या अंगावर प्रचंड सोनं परिधान करायचे. त्यांना सोन्याची खूप आवड होती. पण ते एवढं सोनं का घालत असत आणि त्यांनी कधीपासून सोनं घालण्यास सुरुवात केली याबाबत तुम्हाला माहित आहे का? नसेल तर या लेखाद्वारे त्याबद्दल जाणून घेऊया.
बप्पी लहरी यांनी एका मुलाखतीत बोलताना ते त्यांच्या अंगावर एवढं सोनं का घालतात, याबद्दल खुलासा केला होता. एका हॉलिवूड कलाकारामुळे त्यांनी सोनं घालण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले होते. बप्पी यांना हॉलिवूड गायक एल्विस प्रेस्ली खूप आवडायचे. ते एल्विस यांना प्रत्येकवेळी त्यांच्या गळ्यात एक सोन्याचे चैन घातलेला पाहिले होते. त्यांचा तो अंदाज बप्पी लहरींना खूपच आवडला होता.
बप्पी लहरी तेव्हा संघर्षाच्या काळात होते. आणि त्यांनी ठरवलं होतं की, जीवनात यशस्वी झाल्यावर ते अंगावर भरपूर सोनं घालणार. त्यानुसार बप्पी लहरी त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाले आणि त्यांनी सोनं घालण्यास सुरुवात केली. यामुळेच पुढे जाऊन त्यांना गोल्डमॅन या नावानेही ओळखले जाऊ लागले. रिपोर्टनुसार बप्पी दा यांच्याकडे लाखो रूपयांचं सोनं होतं. २०१४ साली त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यादरम्यान त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या सोन्याबाबत माहिती दिली होती. असे सांगितले जाते की, बप्पी लहरी यांच्याजवळ ७५४ ग्रॅम सोनं होतं. ज्याची किंमत १७,६७, ४५१ लाख रूपये होती.
पत्नीने भेट म्हणून दिला होता सोन्याचा टी-सेट
बप्पी लहरी यांचं सोनं प्रेम पाहून त्यांच्या पत्नीने मागच्या वर्षी धनत्रयोदशीच्या निमित्ताने त्यांना एक सोन्याचा टी-सेट भेट म्हणून दिला होता. यासंदर्भात बॉम्बे टाईम्सशी बोलताना बप्पी लहरी यांनी सांगितले होते की, ‘धनत्रयोदशीच्या दिवशी मी पत्नीला सोन्याचा टी-सेट आणण्यास सांगितलं होतं. मी कुठेतरी एक सुंदर सोन्याचा टी-सेट पाहिला होता आणि ते मला खूपच आवडलं होतं. त्यामुळे मी पत्नीला ते आणण्यास सांगितलं आणि तिने ते आणलंही’.
बप्पी लहरी यांनी ७०-८० च्या दशकात अशी गाणी संगीतबद्ध केली होती, जे आजही लोकांना नाचायला भाग पाडतात. ‘चलते-चलते’, ‘शराबी’, ‘डिस्को डान्सर’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी गाणी संगीतबद्ध केली आहेत. शेवटच्या वेळी त्यांनी टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरच्या ‘बागी 3’ चित्रपटातील एक गाणं संगीतबद्ध केलं होते.
महत्त्वाच्या बातम्या :
बप्पी लहरींच्या या गाण्याचा मायकल जॅक्सनही होता फॅन, गळ्यातील सोनं पाहून म्हणाला होता..
बप्पी लहरींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख; ट्विट करत म्हणाले..
सहा एकरची देवराई जळून खाक झाल्यावर सयाजी शिंदेनी हात जोडून केली विनंती, म्हणाले..