बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आज उत्तमप्रकारे मराठीत बोलताना दिसून येतो. मातृभाषा उर्दू असणारा आणि शिक्षण इंग्रजीत झालेला आमिर खान मोठ्या जिद्दीने मराठी भाषा अवगत केली आहे. पण मुळात आमिरला मराठी का शिकायचे होते, त्यामागची कारणे काय आहेत तसेच त्याने कोणाकडून मराठी शिकून घेतली? हे तुम्हाला माहितीये का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेऊया.
देशातील प्रत्येक नागरिकाला आपली राष्ट्रभाषा, राज्यभाषा आणि मातृभाषा आल्याच पाहिजेत, असे आमिरचे मत आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यानसुद्धा त्याने आपले विचार मांडले होते. आमिरने आपला हा विचार केवळ बोलून न दाखवता ती कृतीत करूनही दाखवण्याचा निर्णय घेतला. त्याला उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषा येत होत्या. मात्र, तो महाराष्ट्रात राहत असल्याने त्याला राज्यभाषा मराठीसुद्धा बोलता आले पाहिजे, असा त्याचा विचार होता. त्यामुळे त्याने मराठी शिकण्याचा निर्णय घेतला.
मराठी शिकण्यासाठी आमिरला मराठीचे उत्तम ज्ञान असणाऱ्या शिक्षकाची गरज होती. त्यामुळे त्याने मराठी शिक्षकाची शोध घेण्याची जबाबदारी त्याचा मित्र आणि अभिनेता अतुल कुलकर्णीवर सोपविली. त्यानुसार अतुल कुलकर्णीने प्रसिद्ध मराठी आणि संस्कृत विषयाचे अभ्यासक सुहास लिमये यांचा दूरध्वनी क्रमांक आमिरपर्यंत पोहोचवला. त्यानंतर आमिर खानने सुहास लिमये यांच्याशी संपर्क साधला.
आमिर खान आणि सुहास लिमये यांची पहिली भेट आमिरच्या खारमधील घरी झाली. पहिल्या भेटीतच सुहास यांच्याकडून मराठी शिकण्यासाठी आमिर खूपच उत्सुक होता. मात्र, मराठी शिकताना त्याला अनेक अडचणी यायच्या. त्यामुळे आमिरला मराठी सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी सुहास लिमये वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करत. त्या नाटकाचे संहिता लेखन ते आमिरलाच लिहिण्यास सांगत. तसेच नाटकातील वेगवेगळे पात्र आलटीपालटीने साकारत ते आमिरला मराठी शिकवत असत.
चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे आमिरला अभ्यासासाठी वेळ मिळत नसे. तेव्हा आमिरने सुहास यांना चित्रपटाच्या सेटवर येऊन शिकवण्यास विचारले होते. त्यानुसार सुहास यांनीसुद्धा अनेकवेळा आमिरला चित्रपटाच्या सेटवर जाऊन त्याला मराठी शिकवले. मराठी शिकण्याच्या तीन महिन्यानंतरच आमिरने मुंबई पोलिसांच्या एका कार्यक्रमात मराठीत भाषण केला. त्यानंतर इतर अनेक कार्यक्रमात आमिर मराठीत बोलताना दिसून आला.
मुंबई विद्यापीठाच्या ‘माय मराठी’ या लर्निंग कोर्सच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आमिरने सांगितले होते की, ‘सुहास लिमये यांच्याकडून मराठी शिकताना मी खूप एन्जॉय करतो. ते मला केवळ मराठीच नाही तर हिंदी, इतिहास, तत्वज्ञान असे सर्व काही शिकवतात. त्यांच्याकडून मला संपूर्ण शिक्षण मिळते’. याशिवाय एका मुलाखतीत बोलताना आमिर खानने म्हटले की, ‘मराठी शिकण्यादरम्यानच्या प्रवासात मी केवळ भाषाच शिकलो नाही तर भाषेविषयीच्या मुलभूत चिंतनाची बीजं माझ्या मनात पक्की रूजली’.
महत्त्वाच्या बातम्या :
‘पुणे-मुंबईची भाषा ही महाराष्ट्राची भाषा नाही’, नागराज मंजुळे असं का म्हणाले?
VIDEO: सामना सुरु असतानाच इशान किशनला करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा नक्की काय घडलं
काही मराठी कलाकारच स्वतः हिंदीत बोलतात तेव्हा ते ऐकून.., अतुल गोगावलेंनी व्यक्त केली खंत