दिवंगत अभिनेते विजू खोटे (Viju Khote) यांनी सिनेसृष्टीतील आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले होते. मराठीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेत त्यांनी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. तर विजू खोटे यांची भाचीसुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर आज त्यांच्या भाचीविषयी जाणून घेऊया.
विजू खोटे यांची बहिण शुभा खोटे यासुद्दा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तर शुभा यांची मुलगी भावना बलसावर म्हणजेच विजू खोटे यांची भाची. भावना यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९७५ रोजी झाला. त्यांनी एसएनडीटी कॉलेजमधून फॅशन डिझाईनिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून भावना यांनी आजपर्यंत अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘देख भाई देख’, ‘जुबान संभालके’, ‘तहकीकात’, ‘करमचंद’, ‘हेरा फेरी’, ‘गुंटर गूं’, ‘बेलन वाली बहू’ अशा काही भावना यांनी अभिनय केलेल्या मालिकांची नावे आहेत. छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाची कला दाखवली आहे. २००२ साली भावना यांनी अभिनेता करण शाहसोबत लग्न केले. सध्या त्या कलर्स वाहिनीवरील ‘स्पाय बहू’ या मालिकेत काम करत आहेत.
दरम्यान, विजू खोटे यांना त्यांच्या वडिलांकडून अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांचे वडिल नंदू खोटे रंगभूमीवरील अभिनेते होते. तसेच त्यांनी अनेक सायलेंट चित्रपटात काम केले होते. वडिलांप्रमाणे विजू खोटे यांनीही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विजू खोटे यांनी त्यांच्या करिअरमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतील ३०० हून अधिक चित्रपटात काम केले.
मराठीतील ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘या मालक’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. तर हिंदीतील ‘शोले’ या चित्रपटातील कालिया या भूमिकेसाठी त्यांना आजही ओळखले जाते. या चित्रपटातील ‘सरदार, मैंने आपका नमक खाया है’ हा त्यांचा संवाद विशेष गाजला होता. बातम्यांनुसार, ‘शोले’ मधील गब्बर सिंहच्या विश्वासू सहकाऱ्याच्या या भूमिकेसाठी त्यांना २५०० रूपये मानधन मिळालं होतं.
‘शोले’शिवाय त्यांनी हिंदीत ‘अंदाज अपना अपना’, ‘इन्सानियत’, ‘जीने की राह’, ‘कर्ज’, ‘अंदर बाहर’, ‘अनोखी रात’ अशा अनेक चित्रपटात काम केले होते. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याचे ३० सप्टेंबर २०१९ साली वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेृसृष्टीवर शोककळा परसली होती. तसेच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
प्रसिद्ध भोजपुरी गायिकेचा MMS झाला लीक, गायिकेने लोकांना शेअर न करण्याचे केले आवाहन
सामंथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य पुन्हा करतोय लग्न? सोशल मिडीयावर चर्चांना उधाण
बॉलिवूडवर शोककळा! अमिताभ बच्चनला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं दुःखद निधन