मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). बालकलाकाराच्या रूपात आपल्या करिअरची सुरुवात करत आज प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता उत्तम डान्सर, निवेदिका आणि कवयित्रीसुद्धा आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर प्राजक्ताने आज सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर आज या लेखातून प्राजक्ताबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.
प्राजक्ताचा (Prajakta Mali) जन्म ८ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील विठुमाऊलींची पावन नगरी पंढरपूर येथे झाला. परंतु, तिचे शिक्षण मात्र पुण्यात झाले. प्राजक्ताची आई गृहिणी तर वडिल पोलीस दलात काम करत आहेत. लहानपणापासूनच प्राजक्ताला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. तर २००७ मध्ये आलेल्या ‘तांदळा एक मुखवटा’ या चित्रपटातून बालकलाकाराच्या रूपात तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
त्यानंतर पुण्यातील ललित कला केंद्र येथून प्राजक्ताने तिचे शिक्षण पूर्ण केले. प्राजक्ता अभ्यासातही हुशार होती. तिने भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असून यासाठी तिला केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यानंतर प्राजक्ताने २०११ साली ‘सुवासिनी’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तसेच यादरम्यान तिने ‘क्या मस्ती क्या धूम’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. तर या शोचे तिने विजेतेपदही पटकावले होते.
प्राजक्ताला (Prajakta Mali) खरी ओळख २०१३ मध्ये आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे मिळाली होती. या मालिकेतील मेघना देसाई या भूमिकेद्वारे प्राजक्ता घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘फिरुनी नवीन जन्मेन मी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकेमध्ये काम केले. तर ‘संघर्ष’, ‘खो-खो’, ‘बंध रेशमाचे’, ‘आली लहर केला कहर’, ‘गोळाबेरीज’, ‘तांडला’, ‘पार्टी’, ‘काशिनाथ घाणेकर ‘, ‘डोक्याला शॉर्ट’, ‘हंपी’, ‘पावनखिंड’ या चित्रपटांतूनही तिने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
अभिनयासोबत आपल्या नृत्याची आवड जोपासत प्राजक्ताने झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक’ या डान्स रिआलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यात तिने तिच्या नृत्याच्या अविष्काराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. केवळ डान्सर आणि अभिनेत्रीच नाही तर ती एक उत्तम निवेदिका असल्याचेही तिने दाखवून दिले. सध्या सोनी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्राजक्ता माळी सांभाळत आहे.
अभिनय, नृत्य, निवेदन यासोबतच प्राजक्ता (Prajakta Mali) एक उत्तम कवयित्रीसुद्धा आहे. ‘प्राजक्तप्रभा’ असे तिने लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे नाव आहे. तिच्या या काव्य संग्रहाला रसिक प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नाही तर प्राजक्ताला फिरायचीही प्रचंड आवड आहे. याच आवडीमुळे तिला झी मराठीवरील ‘मस्त महाराष्ट्र’ हा ट्रॅव्हल शो मिळाला. या शोमुळे महाराष्ट्रातल्या विविध भागात तिला फिरायची संधी मिळाली.
प्राजक्ता (Prajakta Mali) सोशल मीडियावरही खूपच सक्रीय असते. याद्वारे ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच याद्वारे ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते. यामध्ये कधी ते पारंपारिक वेशभूषेत तर कधी वेस्टर्न लूकमध्ये दिसून येते. तिच्या या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचीही खूप चांगली पसंती मिळत असते. तर प्राजक्ताच्या या फोटोंवरून तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्सची प्रचिती येते.
महत्त्वाच्या बातम्या :
‘चित्रपटात काम मिळावं म्हणून काळी जादू करायचे’, बॉलिवूड अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा
अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रियकर विराजसशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर
ऑस्कर विजेत्या coda ने चोरली बॉलिवूड चित्रपटाची कथा? सलमान खानने केली होती ‘त्या’ चित्रपटात भूमिका