सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत जे सध्या आपल्यात नाहीत. परंतु त्यांच्या दमदार कामगिरीमुळे ते आजही लोकांच्या स्मरणात आहेत. अशाच व्यक्तींमधील एक अभिनेत्री म्हणजे ललिता पवार (Lalita Pawar). बॉलिवूडमध्ये ललिता पवार या त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या. परंतु, त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आला जेव्हा त्या खलनायिका बनून प्रसिद्धी मिळवली होती. तर आज या लेखाद्वारे ललिता पवार यांच्याविषयी जाणून घेऊया.
ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ साली नाशिक येथे झाला होता. तर २४ फेब्रुवारी १९९८ साली त्यांचे निधन झाले. ललिता यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. परंतु, त्यांना छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध ‘रामायण’ या मालिकेमुळे फार लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेतील मंथरा या भूमिकेद्वारे त्या घराघरात पोहोचल्या होत्या.
सिनेसृष्टीत ललिता यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी ‘पारिजातक’, ‘भीमसेन’, ‘पृथ्वीराज’, ‘संयोगिता’, ‘नको गं बाई लग्न’, ‘पतित उधार’, ‘सुभद्रा हरण’, ‘गनिमी कावा’, ‘चतुर सुंदरी’ अशा अनेक चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.
‘चतुर सुंदर’ नावाच्या एकाच चित्रपटात त्यांनी १७ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. तर ‘दैनी खजाना’ या चित्रपटात त्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता. १९३५ सालापर्यंत ललिता यांनी मुकपटात काम केले होते. त्यानंतर १९३५ साली आलेल्या ‘हिम्मत ए मर्दा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पहिल्यांदाच बोलपटात काम केल्या. आपल्या दीर्घकालीन करिअरमध्ये ललिता यांनी जवळपास ७०० चित्रपटात काम केले होते.
ललिता पवार अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली होती. परंतु, एका घटनेने त्यांचे आयुष्य उद्धवस्त झाले होते. १९४२ साली ललिता पवार ‘जंग-ए-आझादी’ या चित्रपटात काम करत होत्या. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी एका सीनदरम्यान अभिनेता भगवान दादा यांना ललिता यांच्या गालावर मारायचे होते.
भगवानदादा पैलवान होते आणि सिनेसृष्टीत ते नवखे होते. सीननुसार ललिता पवार यांच्या थोबाडीत भगवानदादांनी मारले. परंतु, त्यांनी ललिता यांच्या कानफटीत इतका जोराचा फटका मारला की, यामुळे त्या कोमातच गेल्या. दीड दिवस बेशुद्धावस्थेत राहिल्यानंतर त्या शुद्धीवर आल्या. परंतु, तोपर्यंत त्यांच्या डाव्या बाजूच्या शरीराला अर्धांगवायूचा झटका बसला. याचा फटका त्यांच्या डाव्या डोळ्यालाही बसला. अर्धांगवायूतून त्या हळूहळू बाहेर पडल्या. पण त्यांचा डावा डोळा पूर्णपणे आकसून गेला होता.
या घटनेनंतर ललिता यांचे मुख्य अभिनेत्री म्हणून करिअर संपुष्टात आले होते. परंतु, त्यांनी हिम्मत हारली नाही. या घटनेच्या तीन वर्षानंतर त्यांनी पुन्हा इंडस्ट्रीत पुनरागमन केले. १९४८ साली आलेल्या ‘गृहस्थी’ या चित्रपटाद्वारे ललिता पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकल्या. त्यानंतर त्यांना पुढे क्रूर सासूच्या आणि नकारात्मक भूमिका मिळत गेल्या. परंतु, या भूमिकाही त्यांनी दर्जेदारपणे साकारत प्रेक्षकांकडून कौतुक मिळवले.
पुढे जाऊन ललिता यांनी ‘अनाडी’, ‘परछाई’, ‘श्री ४२०’, ‘मिस्टर अँड मिसेज ५५’, ‘दहेज’ अशा अनेक चित्रपटात काम केले. चित्रपटात आपल्या नकारात्मक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ललिता यांचा शेवट मात्र खूप वाईटरित्या झाला. १९९० मध्ये ललिता यांना जबड्याच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यामुळे उपचारासाठी त्या पुण्यात स्थायिक झाल्या. परंतु, आजारपणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली होती.
रिपोर्टनुसार, २७ फेब्रुवारी १९९८ रोजी ललिता यांच्या पतीने त्यांना फोन केला. परंतु, त्यांनी तो फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय पुण्यात दाखल झाले. तेव्हा त्यांना ललिता यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले की, ललिता यांचा तीन दिवसाआधीच म्हणजे २४ फेब्रुवारी रोजीच मृत्यू झाला होता. तीन दिवस त्यांचा मृतदेह तसाच पडून राहिला होता. परंतु, त्यांच्या निधनाबद्दल कोणालाच माहिती कळू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
‘KGF 2’ ची क्रेझ! चाहत्याने थेट लग्नपत्रिकेवर छापला यशचा ‘तो’ आयकॉनिक डायलॉग, फोटो व्हायरल
विजू खोटे यांची भाची आहे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री, फोटो पाहून विश्वास बसणार नाही
रोहित-जुईलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले, ‘बाळाला अंघोळ तरी घालायची तुझ्या’