Share

मनसे मेळाव्यावर सेनेची जहरी टीका; ‘राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले’

raj thackeray
२ एप्रिल रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरेंची ही सभा तुफान गाजली. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

या भाषणात राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे काय बोलणार याची एकच चर्चा सुरु होती. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

राज यांच्या मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्या याबाबत माध्यमांशी बोलत होत्या. “आम्हाला वाटलं दोन वर्षाची मोरी तुंबलीय. त्या मोरीतून काही तरी निघेल. पण त्यातून काही निघालं नाही. त्या तुंबलेल्या मोरीतून भाजपाचे गांडूळ निघाले,” असे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, काल राज ठाकरे म्हणाले, मला कडेवर घ्या ना, मला कडेवर घ्या ना… खरं तर ते आमच्यासाठी नव्हतं. हा त्यांचाच त्यांच्यासाठी प्रयत्न होता, असा जबरदस्त टोलाही किशोरी पेडणेकर यांनी लगावला. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यात शाब्दिक युद्धास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, महागाईच्या मुडद्यावरुन देखील किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लक्ष केले. “गगनाला भिडलेल्या महागाईबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही. बाळासाहेबांनी अनेकांना घडवलं, त्यात राज ठाकरेही घडले पण ते असे का बिघडले, हेच कळेना,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हंटले आहे.

काल राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याचबरोबर शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडल्याने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यावरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now