किरण माने सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि त्यांनी केलेल्या फेसबूक पोस्टमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. आता पुन्हा किरण माने यांच्या एका जुन्या कमेंटचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये किरण माने यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह शब्द बोलल्याचं बोललं जात आहे.
या स्क्रिनशॉटमागचं सत्य काय आहे? ती आक्षेपार्ह पोस्ट किरण माने यांनीच केली आहे का? याची पडताळणी एका वृत्तसंस्थेने केली होती. त्यांनी किरण मानेंशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत खुलासा केला. किरण माने म्हणाले की, ही जुनी कमेंट आहे. नक्की कोणत्या पोस्टवर ही कमेंट केली होती हे आठवत नाही. मात्र ही कमेंट मी केलेली असावी.
मी ते नाकारत नाही. पण मला ट्रोल केल्यानंतर ट्रोलर्सच्याच भाषेत मी त्यांना उत्तर देतो. पण ज्या शब्दांचा अर्थ वाईट नसेल अशा शब्दांचा वापर करून मी उत्तर देतो असं किरण माने म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, ज्यावेळी ट्रोलर्स मला उचकवतात तेव्हा मी त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. मी ग्रामीण भागातून येतो. त्यामुळे ग्रामीण भागात वापरले जाणारे शब्द मी वापरतो.
या पोस्टबद्दल बोलायचे झाल्यास फक्त माझ्या कमेंटचा स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. पण त्याच्या आधी ट्रोलर्सने मला उचकवलं असेल. त्यानंतर मी त्यांच्याच शब्दात त्यांना उत्तर दिलं. कमेंटमध्ये वापरलेल्या शब्दांचा अर्थ वाईट नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काही विधानांशी मी सहमत नाही.
त्यांची काही मतं मला पटत नाहीत. पण त्यांच्याबद्दल मी वाईट शब्द वापरले नाहीत. मी वापरलेल्या शब्दांचा अर्थ चुकीचा नाही. जिव्हारी लागतील अशा शब्दांचा वापर केला पण त्याचा वाईट अर्थ नाही. ट्रोलर्सने मला ट्रोल केल्यामुळे मी ती कमेंट केली असावी, असं किरण माने म्हणाले आहेत. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी हा स्क्रिनशॉट फेसबूकला शेअर केला आहे.
हा स्क्रिनशॉट शेअर करत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या बद्दल बोलताना ते म्हणाले की, व्यक्तीस्वातंत्र्य मी ही मानतो. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली जर कुणी काही अपशब्द वापरत असेल तर ते चूकच आहे. किरण माने यांना मालिकेतून काढण्याबाबत ते म्हणाले, जर एखादी राजकीय भूमिका घेतल्याने माने यांना मालिकेतून बाहेर काढलं असेल तर ते चूक आहे, असं ते म्हणाले आहेत. सध्या हा स्क्रिनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्राचा सहकारमंत्री स्वत: कपडे धूत होता; वाचा एन डी पाटलांच्या साधेपणाचा किस्सा
‘हे तर धक्कादायक,’ विराटच्या राजीनाम्यानंतर रोहितने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
२ एकरमध्ये पसरलेल्या आलिशान घरात राहतो स्टायलिश अल्लू अर्जुन, किंमत वाचून थक्क व्हाल
सलमान माझा मोठा भाऊ, मी त्याचा कधीच.., नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर कमाल आर खानचे स्पष्टीकरण