‘केजीएफ २’ (KGF 2) फेम अभिनेता यश सध्या सर्वत्र चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ९ दिवस उलटले तरीही अद्याप चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावरही चित्रपटासंबंधित अनेक क्लीप चाहते शेअर करत आहेत. यादरम्यान चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि प्रेम पाहून रॉकीभाई अर्थात यश भारावून गेला आहे. त्यामुळे त्याने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
यशने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने एका लहान मुलाची गोष्ट सांगितली आहे. तसेच ‘केजीएफ २’ (KGF 2) ला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल त्याने त्यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओत यशने म्हटले की, ‘एक गाव होता त्या गावात अनेक वर्षांपासून दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळामुळे तेथील लोकांचे जीवन खूपच वाईट बनले होते. त्यामुळे एके दिवशी तेथील सर्व लोकांनी मिळून प्रार्थना करण्याचे ठरवले. त्यानुसार सर्व गावकरी गावाच्या एका ठिकाणी एकत्र जमले’.
‘परंतु त्यावेळी तिथे एक मुलगा हातात छत्री पकडून उभा होता. तेव्हा सर्वांची नजर त्या लहान मुलावर पडली. हातात छत्री पकडून उभा असलेल्या त्या मुलाला पाहून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. काही लोकांनी त्याला त्या मुलाचा मुर्खपणा म्हटला तर काहींनी त्याला अतिउत्साही म्हटले. पण त्या छोट्या मुलाचा तो विश्वास होता. आणि आज मला त्या लहान मुलाप्रमाणे वाटत आहे. कारण आज मी जे काही मिळवलं आहे त्यामागचे मोठे कारण म्हणजे मी स्वतःवर विश्वास ठेवणे होतं’.
यशने पुढे म्हटले की, ‘मी आज ज्या परिस्थितीत उभा आहे त्याठिकाणी धन्यवाद हा शब्द खूपच छोटा पडेल. पण तरीही मी तुम्हा सर्व चाहत्यांना ‘केजीएफ २’ (KGF 2) च्या संपूर्ण टीमच्यावतीने धन्यवाद देत आहे. तुम्ही दिलेल्या या प्रेमासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या या प्रेमासाठी आम्ही खूप कृतज्ञ आहोत’. त्यानंतर यश केजीएफमधील त्याचा एक डायलॉग सांगत त्याचे म्हणणे थांबवतो.
यशच्या या व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत भरभरून त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘KGF ब्लॉकबस्टर आहे म्हणणे खूप छोटा शब्द आहे’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘KGF म्हणजे Kannada Golden Film’. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, ‘तुझा हा साधेपणाच तुझ्या यशाचे रहस्य आहे’.
एका चाहत्याने यशने व्हिडिओत सांगितलेल्या कथेबद्दल सांगताना लिहिले की, ‘यश सॅन्डलवूड म्हणजेच कन्नडा सिनेसृष्टीबाबत सांगत आहे. जिथे चित्रपटांचा दुष्काळ पडला आहे. आणि कथेतील तो छोटा मुलगा म्हणजे यश ज्याने आपल्या टीमसोबत मिळून कन्नड सिनेसृष्टीत पराक्रम करून दाखवला आहे. आम्हाला तुमचा अभिमान आहे सर’.
दरम्यान, प्रशांत नील यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘केजीएफ २’ (KGF 2) हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. कन्नडसोबत हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला. प्रदर्शनापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असून सर्व रेकॉर्ड तोडत आहे. हिंदीत या चित्रपटाने ७ दिवसातच जवळपास २५५ कोटींची कमाई केली आहे. अद्यापही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून सर्वत्र केवळ केजीएफचीची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आलियाला सून बनवण्यासाठी कपूर कुटुंबाला साईन करावे लागले हे कॉन्ट्रॅक्ट, वाचा काय लिहीलंय त्यात?
मालाबार गोल्डच्या नवीन जाहिरातीमुळे नेटकरी संतापले, होतेय बहिष्कार टाकण्याची मागणी
‘ना जेवण, ना पाणी, रात्रभर उपाशी राहिलो’; प्रसिद्ध गायकासोबत हॉटेलमध्ये घडला धक्कादायक प्रकार