मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना ठाणे जिल्हा संघटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर आता ठाण्यातील महिला शिवसेना पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
मीनाक्षी शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, शिवसेनेतून आमची कोणी हकालपट्टी करु शकत नाही, आम्ही शिवसैनिकच आहोत, आमचं पद अशा प्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही. बातम्यांमधून दाखवलेलं लेटर अजून तरी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही.
तसेच म्हणाल्या, मला असं वाटतं की हे हास्यास्पद आहे, हकालपट्टी हा शब्द ऐकूनच मला हसायला आलं. तुम्ही अशाप्रकारे सर्वांचीच हकालपट्टी करणार असाल, तर शिवसेना शाखेला टाळं लावायला दोघं तरी ठेवणार आहात का? असा सवाल मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारला.
पुढे म्हणाल्या, कुठलंही पद शाश्वत नसतं, मला तीन वर्षांपासून जिल्हा संघटक हे पद दिलं, तेच कुठल्याही लेटरशिवाय देण्यात आलं. फक्त सामनातून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. म्हणून हकालपट्टीचं जे पत्र मीडियावर दाखवत आहेत, ते माझ्यापर्यंत पोहोचलं नाही आणि मला कोणाचा फोन देखील आला नाही.
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांवर चालणारी ही महिला आघाडी आहे. कारण ही पदं माझ्या आणि शिंदे साहेबांच्या सहीने दिली आहेत, कुठल्या वरच्या नेत्याने दिली नाहीत, शिंदेंच्या कार्याने प्रेरित होऊन ही महिला आघाडी आली आहे. त्यांना सोडून कुठेच जाणार नाही.
बरीच लोक काठावर आहेत, इथे जाऊ की तिथे जाऊ हा विचार करत आहेत. असेच म्हणाल्या, आपण शिवसैनिक आहोत, आणि शिवसैनिकच राहणार आहोत, मी शिंदे साहेबांना गुवाहाटीला फोन केला होता, तर शिंदे साहेब म्हणाले, टेंशन घेऊ नका.
त्यामुळे, आपण शिवसैनिक आहोत, आणि शिवसैनिक हे पद कोणीच काढून घेऊ शकत नाही, ठाण्यातील शिवसेना शिंदे साहेबांसोबत आहे, त्यांना कोणीही हाकलू शकत नाही, अशा शब्दात मीनाक्षी शिंदेंनी आपली हकालपट्टी केल्यानंतर संताप व्यक्त केला.
शिवसेना मध्यवर्तीतून कार्यालयातून देण्यात येणाऱ्या माहितीनुसार, मिनाक्षी शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रसिद्ध होत असणाऱ्या पत्रावर शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची सही आहे.