Share

केदार दिघे थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच भिडले, पटकावला ठाण्यातला ‘तो’ मान; शिंदे प्रत्यूत्तर देणार का?

दसरा मेळाव्यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा वाद शिवसेनेत निर्माण झाला असताना आता आणखी एका वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. नवरात्रीच्या निमित्ताने ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना रंगण्याची शक्यता असून त्याची सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी पाट पूजन केलं आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवात आमने सामने आलेल्या शिवसेनेतील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाचा दुसरा अंक आता ठाणेकरांना पाहायला मिळणार अशी चर्चा सुरू आहे.

ठाण्यातील टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवातील अंबे मातेची मूर्ती कालपासून घडवण्यास सुरुवात झाली आहे. त्याच मूर्तीचा काल पाट पूजनाचा मुहूर्त होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधीच केदार दिघे पोहोचले आणि त्यांनी पाट पूजन केलं.

केदार दिघे यांनी पाट पूजन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पाट पूजन केलं. त्यामुळे आता टेंभी नाका येथील नवरात्रौत्सव नेमका कोणाचा असा वाद आता निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे. येणाऱ्या काळात हा वाद किती वाढतो पाहावं लागेल.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यातील शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर ठाण्यातील बालेकिल्ला वाचवण्यासाठी शिवसेनेने मोठा निर्णय घेतला. दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली.

सध्या ठाण्यात आनंद दिघे यांचे सहकारी राहिलेले खासदार राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. मध्यंतरी ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला, त्यावेळी केदार दिघे यांचे शिंदेंनी पंख छाटले अशी चर्चा होती. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेत सक्रिय होत असल्याने केदार दिघेंची ताकद वाढली आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now