कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे रिलीज होऊ शकला नाही ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन? निर्मात्याचा खळबळजनक खुलासा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या त्याच्या आगामी ‘शहजादा’ या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. ‘शहजादा’ हा चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या ‘अला वैकुंठपुरमलो’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यादरम्यान सध्या हा चित्रपट सध्या वादात अडकल्याचे दिसून येत आहे. तसेच एका निर्मात्याने कार्तिकवर अनप्रोफेशनलिज्मचाही (Kartik Aaryan extremely Unprofessional ) आरोप केला आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

अभिनेता अल्लू अर्जूनचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ हा चित्रपट सुपरहिट झाला. तेलुगूसोबत हिंदीतही या चित्रपटाने यश मिळवले. त्यामुळे ‘पुष्पा’ चित्रपट हिंदीत डब करणारे निर्माता मनीष शाह यांनी अल्लू अर्जूनचा ‘अला वैकुंठपुरमलो’ हा चित्रपटही हिंदीत डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २६ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. तसेच आता ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन टीव्हीवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे निर्मात्यांद्वारे स्पष्ट करण्यात आले.

यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना मनीष शाह यांनी ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय का घेण्यात आला, याचे कारण सांगितले. ‘शहजादा’ चित्रपटाच्या निर्मात्यांमुळे आणि कार्तिक आर्यनच्या धमकीमुळे ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

इंडिया टुडेशी बोलताना मनीष शाह यांनी म्हटले की, ‘अला वैकुंठपुरमलो’चा हिंदी व्हर्जन सिनेमागृहात प्रदर्शित व्हावा, अशी ‘शहजादा’चे निर्माते आणि कार्तिक आर्यनची इच्छा नव्हती. जर ‘अला वैकुंठपुरमलो’ चित्रपटाचा हिंदी व्हर्जन सिनेमागृहात प्रदर्शित झाला तर मी ‘शहजादा’ चित्रपटातून बाहेर पडणार, अशी धमकी कार्तिक आर्यनने निर्मात्यांना दिली होती. तसेच जर कार्तिक चित्रपटातून बाहेर पडला असता तर निर्मात्यांना ४० कोटींचं नुकसान सहन करावं लागलं असतं. कार्तिकचं हे वागणं अतिशय अन-प्रोफेशनल आहे’.

मनीष यांनी पुढे सांगितले की, ‘शहजादा या चित्रपटाची निर्मिती अल्लू अरविंद यांच्याद्वारे करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी मी ‘अला वैकुंठपुरमलो’ चित्रपट हिंदीत प्रदर्शित करण्याचा निर्णय बदलला. मी हे कार्तिक आर्यनसाठी केलं नाही तर केवळ अल्लू अरविंद यांच्यासाठी केलं. एखाद्या बॉलिवूड कलाकारासाठी मी असे का करेन? मी तर त्याला ओळखतंही नाही. माझ्यामुळे अल्लू अरविंद यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला’.

पुढे त्यांनी म्हटले की, ‘माझ्या निर्णयामुळे अल्लू अरविंद यांच्या ४० कोटींचे नुकसान टळलं. पण माझं २० कोटींचं नुकसान झालं. या चित्रपटाच्या डबिंगसाठीच मी २ कोटी रूपये खर्च केले आहेत. ‘पुष्पा’च्या यशानंतर ‘अला वैकुंठपुरमलो’ चा हिंदी व्हर्जन खूप चांगला व्यवसाय केला असता. पण आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. पण हे नुकसान टाळण्यासाठी हा चित्रपट माझ्या ‘ढिनचॅक’ या वाहिनीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे’, असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, अला वैकुंठपुरमलोचा हिंदी रिमेक असलेल्या शहजादा या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती अल्लू अर्जूनचे वडिल अल्लू अरविंद, भूषण कुमार आणि अमन गिल करत आहेत. शहजादा हा चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनप्रमाणे करत होते लाल चंदनाची तस्करी, ५५ मजुरांसह ३ मोठ्या तस्करांना अटक
सलमानचा फार्म हाऊस गुन्हेगारीचा अड्डा? लहान मुलांची तस्करी, कलाकारांचे मृतदेह; सलमानवर गंभीर आरोप
सिद्धार्थ-मितालीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शेअर केले खास फोटो-व्हिडिओ; एकदा बघाच