सध्या हिंदी भाषा या मुद्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अनेक राजकीय नेते यावर आपले मत देत असताना आता बॉलिवूड अभिनेत्यांनी देखील यात उडी घेतली आहे. अजय देवगण नंतर आता अभिनेत्री कंगना रनौतने देखील याबद्दल आपलं मत व्यक्त केले आहे.
दोन दिवसांपूर्वी साऊथचा अभिनेता किच्चा सुदीपनं आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, हिंदी राष्ट्रीय भाषा नाही. यावर अजय देवगणनं प्रतिक्रिया देताना ट्वीट केलं होतं, त्यात त्याने लिहिले होते की,’हिंदी आपली मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा आहे आणि कायम राहील’. तसेच त्यानं किच्चा सुदीपला चांगलंच झापलं होतं.
हिंदी भाषेवरून या दोन अभिनेत्यांमध्ये झालेल्या वाद-प्रतिवाद यानंतर आता अभिनेत्री कंगणाने आपले याबद्दलचे मत व्यक्त केले आहे. तिनं संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी असं वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याने आता राजकीय, सामाजिक जीवनात खळबळ निर्माण झाली आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कंगना म्हणाली, कन्नड, तामिळपासून गुजराती, हिंदी या सगळ्या भाषा संस्कृत भाषेपासून आल्या आहेत. मग संस्कृतला मागे ढकलून आपण हिंदीला का राष्ट्रीय भाषा बनवत आहोत, याचं उत्तर माझ्याकडे नाही. हे त्या-त्या वेळेला घेतले गेलेले निर्णय आहेत.
तसेच म्हणाली, जेव्हा खलिस्तान म्हणतं की आम्ही हिंदीला मानत नाही, तरुण मुलांच्या मनात यावरनं चुकीच्या समजूती पेरल्या जात आहेत. हे लोकं संविधानाचा अपमान करीत आहेत. तामिळ लोकांना वेगळा देश हवा आहे. बंगाल रिपब्लिकन देखील म्हणते, आम्ही हिंदीला भाषा समजत नाही.
तर मग अशा वेळेला तुम्ही हिंदीला मनाई करत नाही आहात, तर दिल्लीमध्ये केंद्रिय शासनच नाही असं म्हणत आहात. असे कंगनाने स्पष्टीकरण दिलं. तसेच म्हणाली, जेव्हा तुम्ही हिंदी भाषेचा अपमान करता तेव्हा तुम्ही संविधानचा अपमान करता. असं वक्तव्य तिनं केलं.
पुढे म्हणाली, दिल्ली सरकार कोणतंही काम हे हिंदी भाषेतूनच करते. जेव्हा आपण दुसऱ्या भाषेच्या लोकांशी बोलतो तेव्हा हिंदी भाषेतून बोलतो. कारण एकमेकांना भाषा कळायला हवी. खरंतर हिंदी, तामिळ, संस्कृत या भाषांना फक्त एकदुसऱ्यांचं म्हणणं समजून घेण्याचं माध्यम बनवलं पाहिजे. हे आपल्यालाच ठरवायला हवं.
कंगना म्हणाली, माझ्या हातात असेल तर मी संस्कृत भाषेला कायद्यानं राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करेन. आपण का संस्कृत भाषेला राष्ट्रीय भाषा करु शकत नाही. शाळांमधून का नाही संस्कृत भाषेला अनिवार्य केलं जात, हे मला अजूनही कळलं नाही. असा कंगनाने सवाल करत तिचं मत व्यक्त केलं.