दरवर्षीप्रमाणे यंदाचा ऑस्कर पुरस्कार २०२२ (Oscar Awards 2022) चा सोहळा नुकताच रविवारी पार पडला. पण यंदाचा हा सोहळा पुरस्कारांसाठी नाही तर एका गोष्टीमुळे फार चर्चेत आला. या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथने सुत्रसंचालक क्रिस रॉकला स्टेजवर जाऊन सनसनीत कानाखाली लावली. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला. ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला असून अनेकजण यावर आपापली प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनेही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने हॉलिवूड अभिनेता विल स्मिथचे समर्थन करत तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान विल स्मिथ क्रिस रॉकला थोबाडीत मारतानाचा फोटो शेअर केला. या फोटोवर तिने लिहिले की, ‘जर एखाद्या मुर्खाने माझ्या आई किंवा बहिणीची खिल्ली उडवून जर काही मुर्ख लोकांना हसवत असेल तर मीसुद्धा तेच करणार जे विल स्मिथने केलं आहे’. कंगनाने पुढे अशीही इच्छा व्यक्त केली की, ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथ तिच्या लॉक अप शोमध्ये यावे.
केवळ कंगनाच नाही तर बॉलिवूडमधील इतर काही कलाकारांनीही या घटनेवर सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री नीतू कपूर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘आणि सर्वजण म्हणतात की, महिला त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत’. अभिनेत्री गौहर खानने लिहिले की, ‘ऑस्कर मिळवला पण प्रतिष्ठा गमावली. एका सहकारी कलाकार झालेल्या हल्ल्याबद्दल वाईट वाटत आहे’.
https://twitter.com/GAUAHAR_KHAN/status/1508347105542168581?s=20&t=zgf3AelbW28xJl0usS1ZQA
काय आहे प्रकरण?
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्रीचा पुरस्कार जाहिर करताना क्रिसने विल स्मिथची पत्नी अभिनेत्री जेडा पिंकेटच्या आजारावर एक विनोद केला. याचा स्मिथला खूपच राग आला. त्यामुळे त्याने चिडून स्टेजवर येत क्रिस रॉकच्या कानाखाली लगावली. तसेच ‘माझ्या पत्नीचे नाव पुन्हा तुझ्या तोंडातून घेऊ नकोस’ असे क्रिसला सांगितले. यावर क्रिसनेही मी अस करणार नसल्याचे म्हटले. पण त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
या सर्व घडलेल्या प्रकारामुळे दोन मिनिट पुरस्कार सोहळ्यात शांतता पसरली होती. परंतु पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या सोहळ्यादरम्यानच विल स्मिथला किंग रिचर्ड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. विलने रिल लाईफमधील भूमिकेसाठी ऑस्कर मिळवला पण रिअल लाईफमधील स्वभावामुळे त्याने त्याची प्रतिष्ठा घालवली, अशी नंतर चर्चा सुरु झाली.
विल स्मिथने मागितली माफी
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यानच्या घटनेमुळे विल स्मिथवर अनेक स्तरातून टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर त्याने इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत क्रिस रॉकची जाहिर माफी मागितली. पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘कोणतीही हिंसा विषारी आणि उद्ध्वस्त करणारी असते. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यानची माझी वागणूक स्वीकारार्ह नाही आणि त्यासाठी कोणताही बहाणा चालणार नाही. माझ्या मते विनोद करणे आपल्या कामाचा एक भाग आहे. पण जेडाच्या आरोग्याबाबत चेष्टा करणे मला सहन झाले नाही. त्यामुळे मी भावनाविवश होऊन तसं केलं’.
विल स्मिथने पुढे लिहिले की, ‘मी सार्वजनिकरित्या तुझी माफी मागू इच्छित आहे क्रिस. मी माझ्या सीमा ओलांडल्या आणि मी चुकीचा होतो. या घटनेमुळे मी खूपच लाजिरवाणा झालो. पण माझ्या प्रतिक्रिया त्या व्यक्तीच्या नाहीत जी मी होऊ इच्छित आहे. प्रेम आणि दयेने भरलेल्या या जगात हिंसेला कोणतीच जागा नाही’.
‘मी अकॅडमीचेही माफी मागू इच्छित आहे. पुरस्कार सोहळ्याचे निर्माते, कार्यक्रमात आलेले सर्व पाहुणे आणि जगभरातील ते सर्व लोक जे हा सोहळा पाहत होते मी त्या सर्वांची माफी मागत आहे. मी विल्यम्सच्या कुटुंबीयांची आणि किंग रिचर्ड्सच्या कुटुंबीयांचीसुद्धा माफी मागू इच्छित आहे. मला दुःख आहे की, माझ्या एका वर्तणुकीमुळे उत्तमप्रकारे सुरु असलेल्या प्रवासाला गालबोट लागले आहे’. यासोबतच त्याने शेवटी लिहिले की, ‘मी अद्यापही माझ्यावर काम करत आहे’.
महत्त्वाच्या बातम्या :
झुंड चित्रपटासाठी ‘भावना भाभी’ची निवड कशी झाली? वाचा तिनेच सांगीतलेला भन्नाट किस्सा
अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रियकर विराजसशी गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य आलं समोर
‘भाजपने ‘द काश्मीर फाइल्स’ ची फुकट तिकिटे वाटली तशीच पेट्रोल-डिझेलसाठी कुपन्स वाटली पाहिजेत’