सध्या देशातील वातावरण हे धार्मिक गोष्टींच्या आजूबाजू फिरताना दिसत आहे. विविध राज्यात धार्मिकतेवर आधारित काहींना काही घटना घडत आहेत. दोन समाजातील भावना भडकवल्याचा प्रयत्न होत आहे. अशीच काहीशी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. येथे चक्क पत्रकारावरच दोन सामाजातील भावना भडकवल्याचा आरोप केला आहे.
राजस्थानमध्ये टीव्ही पत्रकार अमन चोप्रा यांच्यावर दोन समाजातील भावना भडकवल्याचा आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप केला गेला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना अटक झाल्यावर जामीन मंजूर झाला होता. मात्र, एका स्थानिक कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना आणखी एकदा अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पत्रकार अमन चोप्रा यांना अटक करण्याचे कारण म्हणजे, दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये झालेल्या हिंसेनंतर राजस्थानमधील राजगढ येथे 300 वर्ष जुने शिवमंदीर पाडण्यात आलं होतं. त्यासंदर्भात अमन चोप्रा यांनी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
राजस्थानमधील डुंगरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन चोप्रा यांच्यावर अलवार जिल्ह्यातील मंदीर पाडल्याची माहिती देताना समाजाचे माथे भडकावल्याचे आरोप आहेत. त्यांनी राजस्थान सरकारने दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसेचा बदला म्हणून कारवाई केल्याची माहिती टीव्हीवर दिली होती.
यासंदर्भात एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बुंदी आणि अलवार जिल्ह्यात देखील 23 एप्रिलला त्यांच्याविरोधात तीन तक्रारी दाखल झाल्या. देशद्रोह, धार्मिक भावना भडकावणे, दोन गटांत वैर वाढवणे अशा कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. पुढे राजस्थान उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळाला होता, पण डुंगरपूरमधील येथील स्थानिक कोर्टाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलं. अटक वॉरंट काढल्यावर पोलिसांचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी घरी गेले. मात्र, ते फरार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.