विशेष बाब म्हणजे या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः या सभेला आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीसुद्धा प्रमुख हजेरी होती. दरम्यान, भाषण करत असतानाच मिटकरी यांनी एक वक्तव्य केलं.
मिटकरी यांनी लग्नाचा विधी आणि कन्यादानाविषयी केलेल्या वक्तव्यावर ब्राम्हण महासंघाने तीव्र निषेध नोंदवला आहे. विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली असा आरोप ब्राम्हण महासंघाने करत काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन देखील केले होते.
याचाच धागा पकडत जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ‘अमोल मिटकरी यांना सदर विधान करताना मी माइकवर टॅप करुन भाषण थांबविण्याची खूण केली होती, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. माझ्या उपस्थितीत सदर प्रकार घडल्याने मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असंही पाटील म्हणाले.
‘मिटकरी यांचं हे वैयक्तिक विधान होतं. कोणत्याही समाजाला दुखवण्याचा हेतू नव्हता, असेही पाटील यांनी सांगितले. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते. तसेच मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांना अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी प्रतिक्रिया देत ते म्हणाले, मिटकरी यांनी केलेले वक्तव्य एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या खेदजनक आहे.
तसेच अमोल मिटकरी यांनी जे वक्तव्य केलं आहे. ते त्यांचे व्यक्तिगत भाष्य आहे. राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलत नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वत:चा अनुभव सांगितला आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी अमोल मिटकरी यांच्या या प्रकरणातून हातवर केले आहे.