आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा विश्वासू सहकारी राष्ट्रवादीच्या गळाला लागला आहे. युवा स्वाभिमानी पक्षाला अमरावतीच्या नगरसेविका सपना ठाकूर यांनी रामराम ठोकत, राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पाटील यांनी अमरावती शहर आणि ग्रामीण अशा पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. त्यावेळी सपना ठाकूर यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.
यामुळे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवि राणा यांच्या पक्षाला दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. यापूर्वी राणा यांनी राज ठाकरे यांना भोंग्याचा मुद्यावर उघडपणे पाठिंबा दर्शविला हेाता, त्यावेळी युवा स्वाभिमानी पक्षातील तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता.
त्यानंतर आता विद्यमान नगरसेविकेने पक्ष सोडला आहे. सपना ठाकूर यांच्या पक्ष प्रवेशावेळी, जयंत पाटील म्हणाले, अमरावती शहरात सर्व काही असतानाही येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी निवडून येतात, याची मला प्रचंड खंत वाटते. मात्र शहराची सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असा मला विश्वास आहे.
तसेच म्हणाले, आपल्या जिल्ह्याला विचारांचा मोठा वारसा आहे, या जिल्ह्याने आपल्या विवेकाचा वापर करून अनेकदा चांगल्या लोकांना संधी दिली आहे. येणाऱ्या काळातही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करू. यावेळी त्यांनी संजय खोडके यांचं कौतक केलं.
म्हणाले, संजय खोडके यांनी या शहरात चांगल्याप्रकारे पक्ष बांधला आहे. लोकांसोबत संपर्क ठेवणे फार महत्त्वाचे आहे. लोकांसाठी सदैव उपलब्ध राहिले पाहिजे. संजय खोडके हे आपल्या बाईकवर फिरत असताना लोकांशी संवाद साधतात, त्यांच्या अडचणी असतील तर ते सोडवतात, असे जयंत पाटील म्हणाले.