Share

‘तुम्हाला येऊन ८ वर्ष झाली, नवीन सूनबाईपण एवढ्या वेळात शिकून जबाबदारी घेते

भाजपचे खासदार, नेते, आणि केंद्रीय मंत्री सतत काँग्रेसच्या ६० वर्षांच्या राजवटीचा उल्लेख करत असतात. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या संबंधित नेत्यांना फटकारलं आहे. सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्राला खडे सवाल केले आहेत.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. काल लोकसभेत महागाईच्या चर्चेत सर्वपक्षीय खासदारांनी आपला सहभाग नोंदवला. या चर्चेत भाषण करताना सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला खडे बोल सुनावले. महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, जीएसटी या मुद्द्यांवरून सुप्रिया सुळे यांनी केंद्राला घेरण्याचा प्रयत्न केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप काँग्रेस सत्ताकाळातल्या सतत ६० वर्षांकडे बोट दाखवता, पण आता तुमच्या सरकारला देखील आठ वर्षे पूर्ण झालीत. घरातली नवी सून पण इतक्या वर्षात तयार होते, तिलाही इतक्या वर्षात कुठली जबाबदारी टाळता येत नाही.

ती कुटुंबात काही घडलं तर त्याची जबाबदारी घेते. आज दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या भाषणातल्या एका विधानाची आठवण येतीये. त्या म्हणाल्या होत्या, सर्वसामान्य लोकांना टक्केवारीची भाषा कळत नाही. सर्वसामान्य माणूस केवळ ती भाषा समजतो, ज्यात आपल्या खिशातून किती पैसे गेले आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळालं? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तसेच म्हणाल्या, केंद्र सरकारने सुषमाजींचं विधान डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित आहे. लोकांच्या खिशातून ज्यावेळी आपण पैसे घेतो त्यावेळी आपण त्यांना काय देतो, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी ‘दत्त-दत्त-दत्ताची गाय’ ही दीर्घ मराठी कविता सादर करुन दत्त भगवान आणि गाय सोडली तर कवितेतील तूप-दही-लोणी या सगळ्यांवर केंद्राने जीएसटी लावला असल्याचं सांगत परिस्थितीचं गांभीर्य सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारने २०२२ मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं होतं. मग मला आता या सरकारला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं? याबाबत सरकार श्वेतपत्रिका काढून वस्तुस्थिती सांगणार की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now