सांगलीतील एका कार्यक्रमात महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी भाषण केलं, यावेळी महात्मा गांधी यांच्या बद्दल बोलताना ‘गांधींना मारले ते बरे झाले, जिवंत असते तर सध्याची स्थिती पाहून मेले असते’ असे खळबळजनक विधान केले.
सांगलीत क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त ‘स्वातंत्र्य लढ्यातील प्रति सरकारचे योगदान’ या विषयावर व्याख्यान आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी तुषार गांधी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला.
तुषार गांधी म्हणाले, या राज्यात गद्दारांची संख्या आहे. स्वातंत्र्य संग्रामात बेमानी करणारे आणि आता ज्यांच्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या सोबतच गद्दारी करणारे, अशा दोन प्रकारच्या गद्दारांची मिळून सध्या राज्यात सत्ता आहे, अशी टीका त्यांनी राज्यावर केली.
सभोवताली अन्याय अत्याचार सुरू असताना, आपण गप्प बसलो आहोत, लोकशाही जिवंत आहे का , असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोक जबाबदारीने आपलं कर्तव्य निभावतात हा लोकशाहीचा अर्थ आहे. पण कुठले लोक आज संविधानात दिलेले कर्तव्य निभावत आहेत?असाह सवाल त्यांनी केला.
म्हणाले, आज पण ते घाबरतात म्हणून गांधीजींच्या विरोधात असत्याचा प्रचार करतात. आज इतक्या वर्षानंतर गांधी, फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या लायकीचे उरलो आहोत का? असा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे, असे तुषार गांधी म्हणाले.
सत्य ऐकायला शिका आणि सत्य आहे की, आम्ही सध्या नालायक लोकशाहीत आहोत. आपण जगत आहोत ती नालायक लोकशाही आहे, असे तुषार गांधी म्हणाले. चांगलं झालं गांधीजींची हत्या केली. कारण ते जिवंत असते तर आपल्यामुळे रोज तीळ- तीळ मेले असते. चांगलं झालं मारलं, कारण ज्यांनी मारलं त्यांचं जगणं अवघड केलं आहे त्यांच्या आत्म्याने, असे विधान देखील त्यांनी केले.