Share

एका चुटकीत ३०० कोटी कमवू शकतो, तेव्हा त्यांना वाटायचे बाता मारतोय, पण आता ते खरं झालय

सध्या बॉक्सऑफिसवर ‘विक्रम’ हा दाक्षिणात्य चित्रपट प्रचंड कमाई करत आहे. विकेंडच नाही तर आठवड्याच्या इतर दिवसातही हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत आहे. विशेषत: तामिळनाडू आणि केरळ याठिकाणी या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. भारतामध्ये या चित्रपटाने आतापर्यंत २१० कोटींचा गल्ला कमावला आहे.

या चित्रपटात सुपरस्टार कमल हसन आहेत. कमल हसन यांच्या सहा दशकांच्या करिअरमध्ये ‘विक्रम’ हा चित्रपट सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये १०५ कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलताना कमल हसन यांनी काही गोष्टींचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.

कमल हसन म्हणाले, मी आता माझे सर्व कर्ज फेडणार आहे. माझ्या मनाला जे पाहिजे ते मी खाईन. मला माझ्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी जे काही करायचे आहे, जे काही द्यायचे आहे ते मी त्यांना देईन. त्यानंतर, जर माझ्याकडे काहीही शिल्लक नसेल, तर मी म्हणेन की माझ्याकडे ऑफर करण्यासारखे काही नाही.

तसेच म्हणाले, मला दुसऱ्याचे पैसे घेऊन किंवा कर्ज घेऊन इतरांना मदत करण्याचा आव आणायचा नाही. मला कोणत्याही भव्य पदव्या नको आहेत. मला फक्त एक चांगला माणूस व्हायचे आहे. तसेच म्हणाले, प्रत्येकाला पुढे जाऊन प्रगती करायची असेल, तर त्यासाठी पैशाची चिंता न करणारा नेता हवा.

पुढे म्हणाले,  मी जेव्हा म्हटले की मी चुटकीसरशी ३०० कोटी रुपये कमावू शकतो, तेव्हा कुणी समजून घेतले नव्हते. तेव्हा त्यांना वाटायचे मी बाता मारतो आहे. तुम्ही आता हे खरं होताना पाहू शकता, असे कमल हसन म्हणाले. त्यांनी यावेळी खूप सारे कर्ज फेडणार असा युक्तिवाद केल्यानंतर सर्वांच्या भुवया नक्कीच उंचावल्या.

भारतामध्ये ‘विक्रम’ या चित्रपटाचे आतापर्यंत २१० कोटींचा गल्ला कमावला असून, गल्फमध्ये या चित्रपटाने ३३.९ कोटी कमावले आहेत. दरम्यान इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये १०५ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही पहिल्या १० दिवसांची कमाई आहे. एकूण ‘विक्रम’ या चित्रपटाने वर्ल्डवाइड ३१५ कोटींची कमाई केली आहे.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now