1990 साली सुपरहिट झालेला चित्रपट ‘आशिकी’चा अभिनेता राहुल रॉय याचा आज वाढदिवस आहे. राहुल रॉय यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1968 रोजी मुंबईत झाला. राहुलने महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जो ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. चित्रपटाच्या माध्यमातून त्याने तरुणाईला आशिकीचा खरा अर्थ समजावला, मात्र स्वतः च्या प्रेमात त्याला कायम अपयश आलं.
आशिकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला राहुल रॉय हा अभिनेता त्याच्या अनोख्या रुबाबासाठी आणि देखण्या रुपासाठी अतिशय लोकप्रिय झाला होता. आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून त्याने प्रेमाचा खरा अर्थ लोकांना समजवला. मात्र, प्रत्यक्ष आयुष्यात मात्र त्याला प्रेमानं कधीच साथ दिली नाही.
उत्तम जोडीदाराच्या शोधत असणाऱ्या राहुलच्या हातात नेहमीच अपयश आलं. राहुल रिलेशनशिपमध्ये तर होता, पण त्याला कायमस्वरूपी साथ मिळालीच नाही. असं म्हटलं जातं की पूजा भट्ट हिच्यासोबत त्याचं नातं चांगल्या वळणावर आलं. दोघांनी स्क्रीनही शेअर केली.
त्यानंतर हळू हळू दोघांमध्ये जवळीक वाढली, भेटीगाठीही वाढल्या. पण, कामात व्यग्र असल्यामुळे या नात्याला त्यांना अपेक्षित वेळ देता आला नाही. मनिषा कोईरालाशीही त्याचं नाव जोडलं गेलं. मात्र त्या नात्यात देखील असाच प्रकार झाला. एकमेकांना वेळ देता आला नाही.
सुमन रंगनाथन हिच्यासोबत तो तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. सुमन त्याच्याच फ्लॅटमध्ये राहू लागली. यावेळीही कामानंच त्यांच्या नात्यात मीठाचा खडा टाकला. त्यानंतर तीनदा प्रेमात अपयशी ठरलेल्या राहुलनं राजलक्ष्मी खानविलकर हिच्याशी लग्न केलं.
राहुल आणि राजलक्ष्मी खानविलकर यांच्या वयात 11 वर्षांचं अंतर होतं. राजलक्ष्मी करिअरच्या शोधात ऑस्ट्रेलियाला गेली. राहुलनंही तिथे यावं असं तिला वाटत होतं. पण असं झालं नाही. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. काही काळानंतर मॉडेल साधना सिंह हिच्याशी त्याचं नाव जोडलं गेलं. मात्र, राहुलचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहता, राहुलने प्रेमाच्या शोधात कायमच अपयशाचा सामना केला हेच पाहायला मिळेल.