पतीने पत्नीला इतर पुरुषांशी अवैध संबंध ठेवण्यास सांगितले. मात्र, पत्नीने त्यासाठी नकार दिला. याचा राग पतीच्या डोक्यात असल्याने त्याने असे काही पाऊल उचलले जे ऐकून तुम्हांला देखील धक्का बसेल. याआधी तुम्ही असा क्राईम कधी ऐकला किंवा पाहिला नसेल.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून एक अत्यंत लाजिरवाणी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला आपल्या सहा मुलांसमोर गरम तेलाच्या कढईत उकळले आहे. माहितीनुसार, आरोपी पतीने आधी पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केली, त्यानंतर त्याने तिला एका मोठ्या कढईत टाकून उकळलं.
पोलिसांना बुधवारी शहरातील गुलशन-ए-इक्बाल भागातील एका खाजगी शाळेच्या स्वयंपाकघरातील एका मोठ्या कढईत महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती शाळेत चौकीदार म्हणून काम करत होता आणि जवळपास आठ ते नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेच्या नोकर क्वार्टरमध्ये राहत होता.
मृत महिलेचं नाव नर्गिस आहे, तर निर्दयी पतीचं नाव आशिक असल्याची माहिती आहे. भीषण घटनेनंतर नर्गिसच्या १५ वर्षीय मुलीने फोन करुन पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तर इतर तीन मुलं सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या घटनेमुळे मुलं अत्यंत घाबरलेली आहेत.
माहितीनुसार, पोलिसांनी नर्गिसचा मृतदेह वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकतेसाठी जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये पाठवला आहे. मुलांच्या जबाबावरून असे दिसून आले आहे की आशिकने नर्गिसला कढईत उकळण्यापूर्वी उशीने तिचं तोंड दाबून तिची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कढईत महिलेचा एक पायही तिच्या शरीरापासून विलग झालेला आढळून आला. तपासात आढळून आले की, आशिकने नर्गिसला इतर पुरुषांशी अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि तिने तसे करण्यास नकार दिल्याने त्याने तिची हत्या केली.