‘आमदारकी-खासदारकी छत्रपती पदापेक्षा मोठी आहे का’; संभाजीराजेंच्या कट्टर समर्थकाची पोस्ट चर्चेत

सध्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात चर्चा सुरू आहे. राज्यसभेवर जायचे असेल तर शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. याला संभाजीराजेंनी नकार दिला होता. दरम्यान, आता सहावी जागा शिवसेना लढवणार आहे. संभाजीराजे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. आता या घडामोडीवर एका तरुणाची फेसबूक पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे. हा तरुण संभाजीराजे यांचा कट्टर समर्थक आहे. मात्र सध्या त्याचा या घडामोडींमुळे संभाजीराजेंकडून भ्रमनिरास झाला.

यावर त्याने फेसबुक पोस्ट लिहीत आमदारकी-खासदारकी छत्रपती पदापेक्षा मोठी आहे का, असा प्रश्न संभाजीराजे यांना केला आहे. तसेच त्याने बरेच काही लिहून आपले मत व्यक्त केले आहे. संभाजीराजेंचा समर्थक असणाऱ्या या तरुणाचे नाव वैभव कोकट असे आहे.

वैभव कोकटने लिहिले आहे की, संभाजी छत्रपती-कोल्हापूर’ हे नाव सध्या प्रचंड गाजतंय. बऱ्याच चर्चा होत आहेत. यावर लिहावं कि नाही विचार करत वहोतो. पण अगदी दैवत्व बहाल केल्याप्रमाणे तरुण मुले ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, हे पाहून लिहावंच म्हटलं.

सोबतचा माझा त्यांच्या बरोबरचा फोटो 2013 सालचा आहे. तेव्हा मी कॉलेज शिकत होतो. संभाजी छत्रपती यांचा खांद्यावर असलेला हात पाहून तुम्ही समजू शकता की, त्यांचे अन माझे संबंध कसे असतील! त्या काळात संभाजी छत्रपती यांना कोल्हापूर बाहेर फारसे कुणी ओळखत नव्हते.

पुण्यात 2007 साली शैलजा ताई मोळक यांनी संपादित केलेल्या ‘बुधभूषणम’ ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात अजित दादासोबत ते पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रमात दिसले, तो योग प्रवीणदादानींच जुळवून आणला, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या संभाजी छत्रपतींचा कोल्हापूरच्या जनतेने दणदणीत पराभव केला होता.

तेव्हा अंबाजोगाईच्या एका व्यक्तीने त्यांना प्रथम मराठवाड्यात आणून, लोकांना ओळख करून दिली. आमची पण त्यांच्याशी ओळख झाली. त्यांना पश्चिम महाराष्ट्र मध्ये कोणी विचारत नसताना अंबाजोगाईचे काही लोकं दरवेळी त्यांचे भव्य असे स्वागत- सत्कार करायचे.

मराठा संघटनांनी आझाद मैदानात त्यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण मोर्चा काढलेला. त्याला मी उपस्थित होतो. त्यानंतर ‘शिव-शाहू यात्रा’ काढली. असं म्हणतात, की या यात्रेचा सगळा खर्च आणि नियोजन प्रवीण गायकवाड यांनी केले होते. यातही मी त्यांच्या सोबत काही ठिकाणी फिरलो. या यात्रेत ते प्रत्येक सभेत म्हणायचे की, ‘आमदार- खासदार- मंत्री पेक्षा छत्रपती पद महत्वाचे आहे! मी कधीच राजकीय पद घेणार नाही!’

2014 ला राज्यात आणि केन्द्रात सरकार बदल झाला. ‘भाजप’कडून राजेंना खासदारकी ऑफर आली, असं त्यांनी दाखवलं. पण त्यासाठी त्यांनीच प्रयत्न केले होते. खासदारकीसाठी आपल्या तोंडचे शब्द ते विसरले आणि छत्रपती पदाला दुय्यम मानून त्यांनी स्वहितासाठी खासदारकी स्वीकारली.

तर आता राजे खासदार झाले, अनेकांना त्याचं चांगले वाटलं, काहींना नाही. राजे खासदार झाले पण राजेंना खासदार पदापर्यंत पोहोचवण्यामागे अनेक हात होते. त्यांना ते आपसूकच विसरून गेले. अगदी राजेंना राजवाड्या बाहेर काढून जनतेत नेणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्यांनी कधी विचारलं नाही

मराठा समाजाला काही सरकारी सुविधा मिळाल्या, त्या फक्त ‘मराठा क्रांती मोर्चा’मुळे! बाकी संभाजी छत्रपती यांच्या 6 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 6 मराठा तरुणांना पण स्वतःच्या पायावर उभा केलेले नाही, आज जे त्यांच्या ‘सपोर्ट’मध्ये मीडियात विखारी बोलतात ते कोण?

नाशिक, पुणे, नगर, बीड, औरंगाबाद मधील क्रांती मोर्चातून निघालेले दलाल लोकं! ते कोण आहेत? स्थानिक भागात त्यांची इमेज काय आहे ? याची जरा माहिती घ्यावी. त्यांची नावे अनेकांना माहिती असतीलच. आता विषय मराठा क्रांती मोर्चावर आलाय, तर सांगतोच. मित्रहो हे आंदोलन संपल्या नंतर क्रांती मोर्चा या नावावर अनेक दलाल समोर आले.

समाजातील चांगले लोकं आपल्या आपल्या कामाला गुंतले. मात्र या दलालांनी आपण म्हणजेच समाज असं चित्र तयार केलं. आज सरकार दरबारी ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या लेटरहेडवर या दलालांनी ‘आम्हाला एखादे कंत्राट द्या’, ‘ह्याची बदली करा’, अशी अनेक पत्रे शासकीय विभागात दिलेली आहेत. मोर्चा कशासाठी निघाला होता अन या दलालांनी काय सुरु केले ?

https://m.facebook.com/story.php?story_fbid=5090046901071846&id=100001997600675

क्रांती मोर्चा निघायच्या आधी एसटी- बसने फिरणारे समन्वयक आता इनोव्हा-एन्डेव्हर ने फिरतात. कुठून आले एवढे पैसे ? यांचे मी नावे सांगू का ? आता हेच लोक समाजाला काही भेटलं नाही, यापेक्षा संभाजी छत्रपतींना महाविकास आघाडी तर्फे खासदारकी भेटली नाही म्हणून टिव्ही च्यानल्सच्या मधून राग व्यक्त करत आहेत.

समाजापेक्षा छत्रपती मोठे झाले का ? संभाजी छत्रपती हे नेते असतील,तर ते ह्या दलालांचे असतील. मराठा समाजाचे नाहीत.असे अनेक मुद्दे लिहून तरुणाने आपले मत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.