Share

मातोश्री बंगला काय मशीद आहे का? राज ठाकरेंनी शेलक्या शब्दांत राणा दाम्पत्याला झापले

गुढीपाडव्याच्या सभेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा याबाबत भूमिका घेतली होती. यानंतर महाराष्ट्र राजकारण चांगलंच तापलं. मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचे चॅलेंज देणाऱ्या राणा दाम्पत्यांनाच आता राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा अट्टाहास केल्याने अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. दरम्यान, जामीन मिळल्यानंतर दोघांना सोडवण्यात आलं. प्रकृती ठीक नसल्याने नवनीत राणा यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.

त्यानंतर देखील, हनुमान चालिसेचा मुद्दा राणा दाम्पत्यांनी लावून धरला आणि शिवसेनेवर टीका करण्यास आणखी एकदा सुरुवात केली. यावर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वाद-प्रतिवाद सुरू झाले. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि रवी राणा यांचा सोबत जेवण करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

या व्हिडिओ वरून राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. राज ठाकरे पुण्यातील सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ते आपल्या विरोधात एकत्र येतात, बाकी वेळी भांडत असतात. म्हणजे बघा ना ते राणा मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेले होते.

अरे मातोश्री बंगला काय मशीद आहे का? त्यांना अटक केली, मग ते आत होते, मधू इथे आणि चंद्र तिथे, मग ते एकत्र आले, त्यांना सोडलं. शिवसेनेकडून वाट्टेल ते बोलले, शिवसेना वाट्टेल ते बोलली. एवढ्या सगळ्या ड्रामानंतर हे दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. ज्यांच्यामुळे एवढं प्रकरण घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही जेवताय, ह्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत जे राणा दाम्पत्य एवढ्या दिवस राजकारणात चर्चेत आलं, जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात थेट दिल्लीत गेले, आज त्यांच्यावरच राज ठाकरेंनी टीका केली. यामुळे येणाऱ्या काळात राणा दाम्पत्य विरुद्ध राज ठाकरे अशी परिस्थिती दिसणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now