देशभरात पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि दिल्लीत पूर्वीपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत. आता चालू आयपीएल 2022 मध्येही कोरोनाची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. सध्या आयपीएलमध्ये खेळत असणाऱ्या एका संघात कोविड-19 चे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
आयपीएल मधील ज्या संघात कोविड-19 चा रुग्ण आढळला आहे, तो संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्स. या संघातील एका खेळाडूला कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व संघ सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या आरटीसीआर टेस्टमुळे क्वारंटाईनमध्ये राहणार आहे.
याशिवाय दिल्लीच्या पुढील सामन्यासाठी त्यांचा पुण्याचा दौराही कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. सध्या दिल्लीचा संघ मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये थांबला आहे. कोविड चाचणी केल्यानंतर, अहवाल येईपर्यंत खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.
याआधी शुक्रवारी दिल्लीतील फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले. संघात आणखी एक कोविड रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्याने युजर्स ‘Cancel IPL 2022’ हॅशटॅग वापरून ट्विट करत आहेत. कोविडमुळे अनेक लोक आयपीएल रद्द करण्याची मागणी करत आहेत.
Cancel IPL I beg u @BCCI , nothing is above players health. Don't risk it,sports can be played later .Player's health is top priority#CancelIPL2022
— HappyWith7Wins (@saiteja7781) April 18, 2022
हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर खूप ट्रेंड करत आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर अनेक लोक याबाबत मीम्स शेअर करत आहेत. आयपीएलची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे आणि त्याबद्दल हॅशटॅग बरेचदा ट्रेंड करतात. दिल्लीच्या टीमचा कोविड अहवाल पुढे कसा येतो हे पाहणं आवश्यक राहील.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील सामन्यासाठी बीसीसीआयशी चर्चा सुरू आहे. विशेषत: त्यांच्या पंजाबविरुद्धच्या सामन्याबाबत चर्चा सुरू आहे, हा सामना बुधवारी एमसीए स्टेडियमवर होणार आहे. सध्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली पाच सामन्यांत तीन पराभवांसह आयपीएल गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.