iPhone 17 Launch Event : जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींच्या नजरा लागलेल्या ॲपलच्या (Apple company) वार्षिक “Awe Dropping” इव्हेंटला आता अवघे काही तासच उरले आहेत. हा कार्यक्रम 9 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता भारतीय वेळेनुसार होणार असून, यावेळी कंपनी आपली बहुचर्चित iPhone 17 सिरीज (iPhone 17 series) बाजारात आणणार आहे.
या नव्या आयफोनमध्ये आकर्षक स्लिम डिझाईन, सुधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) फीचर्स, अधिक ताकदवान कॅमेरा सिस्टीम आणि दमदार परफॉर्मन्स असे बदल पाहायला मिळतील, अशी चर्चा आहे. पण भारतीय ग्राहकांसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे – या फोनची किंमत नेमकी किती असेल?
भारतीय बाजारातील किंमतीवर लक्ष
तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन संस्था टेकआर्क (Techarc research)च्या अंदाजानुसार, भारतात iPhone 17 च्या बेस मॉडेलची किंमत साधारणतः ₹86,000 पर्यंत पोहोचू शकते. गेल्या वर्षी बाजारात आलेल्या iPhone 16 ची किंमत ₹79,900 होती. म्हणजेच यंदा जवळपास ₹6,000 ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून डॉलर-रुपया विनिमय दराचा थेट परिणाम आयफोनच्या किंमतीवर होत आहे. सरासरी पाहता दरवर्षी 7.6% ने आयफोनच्या किंमती वाढल्या आहेत, तर रुपयाची घसरण सुमारे 5.2% इतकी झाली आहे. महागाई गृहित धरली तर किंमतवाढ प्रत्यक्षात 2.4% एवढीच आहे.
iPhone किंमतींचा प्रवास
-
2008 : iPhone 3G – ₹31,000
-
2010 : iPhone 4 – ₹34,500
-
2012 : iPhone 5 – ₹45,500
-
2014 : iPhone 6 – ₹53,500
-
2016 : iPhone 7 – ₹60,000
-
2017 : iPhone 8 – ₹64,000
-
2017 : iPhone X – ₹89,000
-
2020 ते 2024 : iPhone 12 ते iPhone 16 – ₹79,900
-
2025 अंदाज : iPhone 17 – ₹86,000
या प्रवासातून स्पष्ट होते की, iPhone च्या किंमती सातत्याने चढत्या दिशेनेच गेल्या आहेत.
भारतात उत्पादन, तरीही महागाई कायम
ॲपल कंपनी आता भारतातच iPhone 17 चे असेंब्ली करणार आहे. मात्र कॅमेरा, डिस्प्ले आणि प्रोसेसर यांसारखे महत्त्वाचे घटक अजूनही परदेशातून आयात करावे लागतात. त्यामुळे विदेशी चलनातील चढ-उतार अंतिम किंमतीवर थेट परिणाम करणार आहेत.
स्थानिक उत्पादनामुळे सप्लाय चेनला काही प्रमाणात स्थैर्य मिळेल, पण त्याचा फायदा ग्राहकांना किंमतीत फारसा जाणवणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ॲपलची वाढती पकड
टेकआर्कच्या अहवालानुसार, 2025 मध्ये भारतात ॲपलचे शिपमेंट 1.5 कोटी युनिटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात ॲपलचा हिस्सा 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. फक्त दशकभरापूर्वी हा हिस्सा अवघा 1 ते 1.5 टक्क्यांच्या दरम्यान होता.
ग्राहकांची उत्सुकता शिगेला
आता सर्वांचे लक्ष उद्याच्या इव्हेंटकडे लागले आहे. iPhone 17 मध्ये slim design, AI फीचर्स, बॅटरी परफॉर्मन्स आणि कॅमेरात कोणते बदल दिसतील, हे जाणून घेण्यासाठी ग्राहक उत्सुक आहेत. उद्या ॲपल खरंच बेस मॉडेलची किंमत ₹86,000 जाहीर करते का, की भारतीय बाजारासाठी काही विशेष ऑफर आणते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.