राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून फडणवीस आणि शिंदे यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. राज्यातील सरकार म्हणून गुण्यागोविंदाने गाडा हाकत असताना आता त्यांच्यातील नेत्यांमध्ये रस्ते विकास निधीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
कल्याण डोंबिवली मध्ये रस्ते विकास निधीवरून शिंदे फडणवीस सरकार मधील नेत्यांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
भाजपचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले, ४७० कोटींचा रस्ते विकास निधी तत्कालीन नगरविकास मंत्री शिंदे यांनी रद्द केला होता. ‘तेव्हा केलेले पाप धुवून काढा,’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री यांना उपहासात्मक टोला लागवला. यावर आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे.
शिंदे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पलटवार केला. म्हणाले, ‘चव्हाण साहेब विसरले की ते कॅबिनेट मंत्री आहेत. मागील १३ वर्षात त्यांनी विकास कामे रखडवून जे पाप केले ते झाकण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत’.
डोंबिवलीत रविवारी आयोजित एका खासगी कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले होते की, भाजपची सत्ता असताना, ४७२ कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या. मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकार मधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली आणि वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला.
तसेच चव्हाण म्हणाले होते, ज्यांनी कोणी रद्द केला त्यांनीच हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांना आदेशही दिले आहेत, पण आता एक महिना झाला आहे, काहीच उत्तर मिळालं नाही, केलेले पाप आता धुवून टाका, असं चव्हाण म्हणाले होते.
यावर, दिपेश म्हात्रे म्हणाले की, चव्हाण साहेब कदाचित विसरले आहेत की ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. गेले दोन वर्ष त्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यामध्ये घालवले. ४७० कोटीचा कुठलाही निधी मंजूर झाला नसताना वारंवार सांगायचे की ४७० कोटी मंजूर झाले होते ते रद्द केले.