सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल, गँस, अशा जीवनावश्यक वस्तूंमध्ये सतत वाढ होत असल्याने सामान्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशातच सामान्य लोकांसाठी अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता औषधांच्या किमती देखील वाढणार आहेत.
सरकारने शेड्यूल औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीत देखील वाढ होणार आहे. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. किरकोळ आजारी पडल्यानंतर जी आवश्यक औषधे घेण्यात येतात त्यात महागाई होणार असल्याने त्याचा फटका सामान्यांच्या बजेटवर बसणार आहे.
पुढील महिन्यापासून पेन किलर आणि पॅरासिटामॉलसारख्या अँटीबायोटिक्स, फेनिटोइन सोडियम, मेट्रोनिडाझोल यांसारखी अत्यावश्यक औषधे महाग होऊ लागतील. केंद्र सरकारने देखील या शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. येत्या 1 एप्रिल पासून यामध्ये वाढ होणार आहे.
माहितीनुसार नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीकडून शेड्यूल्ड औषधांच्या किमतींमध्ये 10.7 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेड्यूल प्रकारातील औषधांचा समावेश हा अत्यावश्यक औषधांमध्ये होतो. यावर सरकारचे नियंत्रण असते. भारतामध्ये शेड्यूल प्रकारात 800 पेक्षा अधिक औषधांचा समावेश आहे.
एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या मते, औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोबतच मनुष्यबळाची किंमत देखील वाढली आहे. अशा स्थितीमध्ये औषधांच्या निर्मितीचा खर्च वाढल्याने, पूर्वीच्या दरात औषधांची विक्री करणे परवडत नसल्याने औषधांचे दर वाढवण्याची मागणी करण्यात आली.
नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीनुसार, ही दरवाढ ठोक खरेदी विक्रीच्या आधारावर करण्यात येणार आहे. मात्र तरी देखील या दरवाढीचा फटका हा किरकोळ खरेदीदारांना देखील बसणार आहे. यामुळे आता सामान्य जनतेच्या खिशाला अधिकच फटका बसणार असून, सामान्यांचे जीवन मुश्किल होणार आहे.