प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या वक्तव्याने सतत चर्चेत असतात. मात्र, आता त्यांच्या पुढे अडचण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी नेकनूर मधील नागरिकांनी केली आहे.
इंदुरीकर महाराजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी नागरिकांनी नेकनूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं आहे. बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांवरती वेगवेगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी आंदोलक नागरिक करत आहेत.
आजपर्यंत आपण महाराज इंदुरीकर यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले ऐकलं आहे. मात्र, बीडच्या कळसंबरमध्ये दिलेल्या तारखेला कीर्तनाला येऊ शकत नाही अशी माहिती दिल्याने, ग्रामस्थांनी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात नेकनूर ठाण्यामध्ये धाव घेतली आहे.
नेकनूर ग्रामस्थांनी सांगितलं की, इंदुरीकर महाराजांनी काल आम्हाला कीर्तनाची तारीख दिली होती. त्यामुळे आम्ही गाव परिसरात रिक्षाच्या माध्यमातून कीर्तन आहे, असं आवाहन देखील केलं होतं. कीर्तनाच्या तयारीसाठी ग्रामस्थांचे आतापर्यंत एक ते दीड लाख रुपये खर्च झाले.
मात्र, आता ऐनवेळी इंदुरीकर महाराजांनी मी कीर्तनाला येऊ शकत नाही, असं सांगितलं. त्यामुळे महाराजांनी आमची फसवणूक केली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच म्हणाले, जर महाराज आमच्या गावात न येता दुसऱ्या ठिकाणी कीर्तनाला गेले तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आम्ही पुढे येऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
जर तुम्हाला बरे नसेल, पित्ताचा त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला दवाखान्यात नेतो. मात्र दिलेला शब्द मोडू नका. आमची फसवणूक करू नका. गावातील लोकांनी २-२ रुपये गोळा करून रक्कम जमा केलेली होती. असे फसवणे बरे नाही. निदान तुम्ही लोकांना फसवू तरी नका, असेही गावकरी म्हणाले.