नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. निवडणुकीत भाजपने पाच पैकी चार राज्यात दणदणीत विजय मिळवला, असे असताना आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
पाटीदार समाजाचे नेते आणि काँग्रेसचे गुजरातमधील कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. हार्दिक पटेल यांनी गुजरातमधील काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याचं म्हटलं आहे. तसेच काँग्रेस पक्षात काम करू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुजरातमधील काँग्रेस पक्ष नेतृत्वाला कोणी काम करावे, असे वाटत नाही. एखाद्याची पक्षासाठी काम करण्याची, संघर्ष करण्याची इच्छा असेल, तर स्थानिक पक्ष नेतृत्वाकडून त्यात अडथळे निर्माण केले जातात. जर असेच सुरु राहिले तर आम्ही जनतेचे प्रश्न कसे सोडविणार? असा सवाल हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेऊन आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. तसेच चांगला विरोधक म्हणून काँग्रेसला संघर्ष करायला हवा. विरोधी पक्ष म्हणून तसे करण्यास आम्ही असमर्थ ठरत असू, तर आम्हाला पर्यायांवर विचार करावा लागेल, असे सूतोवाच देखील त्यांनी केले.
हार्दिक पटेल यांनी एकीकडे काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे, भाजप पक्षाचे कौतुक केले आहे. भाजपकडे चांगले नेतृत्व आहे. ते वेळेत आणि योग्य निर्णय घेतात असे पटेल म्हणाले. मात्र, यावेळेस भाजप प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.
तसेच हार्दिक पटेल म्हणाले, मी प्रभू श्रीरामांना मानत असून, रामभक्त आहे. वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 4 हजार भगवद्गीता वाटप करणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी, हिंदू असल्याचा गर्व असल्याचं पटेल यांनी नमूद केले. हार्दिक पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने ते बंडखोरीच्या तयारीत तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.