रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ले करत तेथील ठिकाणं उध्वस्त केल्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्याचे भयंकर व्हिडिओ पाहून, युक्रेन मध्ये असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी भारताने हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच एका भारतीय विद्यार्थीनीने युक्रेन सोडण्यास नकार दिला आहे.
युक्रेन मध्ये भारतातील अठरा हजाराहून अधिक विद्यार्थी अडकले आहेत. युक्रेनमधून या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विद्यार्थी भारताकडे मागणी करत आहेत. तर त्यांना सोडवण्यासाठी केंद्रसरकार हालचाली करताना दिसत आहेत. काही विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात आले आहे. मात्र भारतात परत जाण्यास एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या नेहाने नकार दिला आहे.
नेहा ही मूळची हरियाणा मधील आहे. हरियाणात ती चरखी दादरी जिल्ह्यात राहते. सध्या ती युक्रेन मध्ये कीव येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिथे ती पेइंग गेस्ट म्हणून एका घरात राहत आहे. नेहा ज्या घरामध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहात होती त्या घराचा मालक स्वेच्छेने युक्रेनच्या सैन्यात रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान आपल्या देशाची सेवा करण्यासाठी सामील झाला आहे.
या घरमालकाची पत्नी आणि तीन मुली त्या घरात आहेत. ती राहत असलेल्या घराच्या परिसरात रशियाने हल्ला केल्यानंतर नेहा, घरमालकाची पत्नी आणि तीन मुलांसह बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. घरमालकाच्या पत्नीची आणि त्याच्या तीन लहान मुलांची काळजी घेण्यासाठी आपण तिथेच राहणार असल्याचे नेहाने आपल्या कुटुंबियांना सांगितले आहे.
दुसरीकडे, नेहाचे कुटुंबीय आणि ओळखीचे लोक तिला भारतात परत येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तिने तसे करण्यास स्पष्टपणे आणि ठामपणे नकार दिला आहे. दरम्यान ”मी जगेल किंवा नाही, पण मी या मुलांना आणि त्यांच्या आईला अशा परिस्थितीत सोडणार नाही,” असे नेहाने तिच्या आईला सांगितले.
नेहाचे वडील भारतीय सैन्यात होते. पण, दोन वर्षांपूर्वी वडिलांना गमावले. नेहा एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी कीव येथे गेली. वसतिगृहाची सोय नसल्याने त्यांनी एका अभियंत्याच्या घरात भाड्याने खोली घेतली होती. घरमालकाच्या मुलांमध्ये मिसळली आहे, म्हणून ती त्यांच्या रक्षणासाठी भारतात येत नाही असे सांगितले जात आहे.