एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे गट आणि फडणवीस यांनी एकत्र येत महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल केला. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळले. महाराष्ट्रात एकीकडे शपथविधी झाला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस आली. २००४, २००९, २०१४ आणि २०२० च्या निवडणूक शपथपत्राबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, महाराष्ट्र सरकार बदलल्यानंतर लगेचच आयकर विभाग शरद पवार यांना २००४, २००९, २०१४ आणि २०२० च्या निवडणूक शपथपत्राबद्दल नोटीस देतो. हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे कुठेतरी शरद पवार यांना आयकर विभागाकडून मिळालेल्या नोटीसीचा संबंध या पत्रकार परिषदेतील त्यांच्या वक्तव्याशी असावा असे बोलले जात आहे.
तसेच शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर देखील प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार म्हणाले होते, आमदार इतकी टोकाची भूमिका घेतील वाटलं नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या लोकांना बाहेर पडायला प्रभावित केलं. गुवाहाटीला एवढे आमदार नेण्याची कुवत शिंदे यांनी दाखवली, असं पवार म्हणाले.
तसेच, एकनाथ शिंदे यांचं बंड आधी ठरलं होतं का याची मला कल्पना नाही, पण तयारी असल्याशिवाय हे झालं नाही. सगळ्या गोष्टी एका दिवसात घडू शकत नाही. उद्धव ठाकरे एखाद्यावर विश्वास टाकल्यावर पूर्ण जबाबदारी टाकतात, ज्यावेळी ३९ लोक राज्याच्या बाहेर जातात तेव्हा त्यांचं मन परिवर्तन कसं करणार, असा सवाल देखील शरद पवारांनी केला होता.