जयपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या ट्रकमध्ये भरुन दोन नंबरचा पैसा भाजपच्या कार्यालयात पोचवला जातो, असा आरोप गेहलोत यांनी केला आहे.
अशोक गेहलोत म्हणाले, भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यात निमलष्करी दल किंवा पोलिसांच्या ट्रकमधून पैसा आणला जातो. भाजप कार्यालयाच्या मागे हा ट्रक नेण्यात येतो. ती गाडी निमलष्करी दल आणि पोलिसांची असल्यामुळे तिला पकडणार तरी कोण?
त्यात पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान असल्यामुळे लोकांना वाटतं या गाड्या त्यांच्याच आहेत. अशा पद्धतीने भाजपचे देशात हे मोठे षडयंत्र सुरू आहे. गोवा, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील सरकारे ही काही कांदा-बटाट्यांनी पडलेली नाहीत असे गंभीर वक्तव्य गेहलोत यांनी केलं.
तसेच म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटीबंदी जाहीर केली. ज्यांना जादा जागा लागते, अशा ५००-१००० नोटा बंद केल्या. त्या वेळी १००० रुपयांची नोट बंद करुन त्यांनी २००० रुपयांच्या नोटा सुरु केल्या. कारण, पैशाची वाहतूक करताना २००० रुपयांच्या नोटांमुळे कमी जागेत जादा रक्कम बसते त्यामुळेच नोटबंदी करण्यात आली आहे.
गुजरात मॉडेल वरती बोलताना म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे गुजरात मॉडेल फ्लॉप झाले आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी त्याची सुरुवात केली. त्याचा आधार घेत मोदी दिल्लीपर्यंत पोहचले आहेत. पण, मुळात गुजरात मॉडेल वगैरे काही नव्हते. ते केवळ मार्केटिंग होते.
आजही भाजप मार्केटिंगवर हजारो कोटी रुपये खर्च करीत आहे, असा गंभीर आरोप अशोक गेहलोत यांनी यावेळी केला. आता भाजपवर केलेल्या या मोठ्या आरोपाला भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या गेहलोत यांनी केलेल्या वक्तव्यांने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.