सध्या महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. मात्र, विरोधक नेहमीच महाविकास आघाडीवर विविध मुद्दे घेऊन टीका करताना दिसतात. अशातच, भाजप खासदार सुजय विखे यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
भाजप खासदार सुजय विखे यांनी यावेळी ईडीच्या कारवाईवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. म्हणाले, आम्ही त्यांना चोऱ्या करायला सांगितले नाही. त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई तर होणार. असे सुजय विखे यांनी सांगितले.
तसेच म्हणाले, देशाचे पंतप्रधान म्हणतात की ‘मै चौकीदार हूं’ त्यामुळे देशाचं संरक्षण करणं त्यांचं कर्तव्य आहे. जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर पुरावे द्यावे, टीव्हीवर येऊन बोलण्याची काय गरज आहे असं विखे यांनी ईडीच्या कारवाईवर बोलणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
यावेळी, किरीट सोमय्या यांना काल पोलिसांनी दिलेल्या वागणुकीबद्दल बोलताना विखे म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांना अटक करताना राज्य सरकारने कोणताही विचार केला नाही. आता आम्ही त्यांचे केवळ दोन मंत्री उचलले तर एवढी तळतळ होते, अजून तर खूप मोठी लिस्ट बाकी आहे.
सुजय विखे यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देत असताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आणि आघाडीची मजा घेत म्हणाले, महाविकास आघाडीचा एक प्रकारे संसार आहे. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं लग्न आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे, तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे.
या दोघांच्या लग्नात काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचे ताट सोडायला तयार नाहीत. अशा शब्दांत विखे यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता विखे यांच्या टीकेला महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतील पाहावं लागेल.