कर्नाटक राज्यात हिजाब वरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविद्यालयात तरुणींना हिजाब वापरण्यास मनाई करण्यात आली, त्यामुळे हा मुद्दा एवढा पेटला की सध्या हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले आहे. त्यातच आता उज्जैनच्या महाकाल मंदिरात बुरखा घातलेल्या महिलेला दर्शन घेताना पाहून गुरुवारी एकच खळबळ उडाली.
बाबा महाकालच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनाही बुरखा घातलेल्या या महिलेला पाहून धक्काच बसला. यादरम्यान, मंदिरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांची नजर त्या महिलेवर पडली आणि त्यांनी महिलेला रोखले. बुरख्यात बाबा महाकाल यांच्या दर्शनासाठी मंदिरात आलेल्या महिलेची माहिती मंदिर प्रशासनाला देण्यात आली.
महिलेची चौकशी केली.वास्तव समोर आल्यानंतर समितीने तिला दर्शनाची परवानगी दिली, त्यानंतर महिलेला बाबा महाकालचे दर्शन घेता आले. मिळालेल्या माहितीनुसार, बुरख्यात महाकाल मंदिरात आलेली महिला मुस्लिम नव्हती. ती राजस्थानमधील भिलवाडा येथून मंदिरात दर्शनासाठी आली होती. ‘लक्ष्मी’ असे या महिलेचे नाव असून ती आई आणि वडील दालचंद यांच्यासोबत मंदिरात पोहोचली होती.
महाकाल मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असून, ती बुरख्यात महाकाल मंदिरात येण्यासाठी अनेक दिवसांपासून कुटुंबीयांकडून आग्रह धरत होती.
तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुटुंबीय तिला मंदिरात घेऊन आले. त्याचवेळी पोलिसांनी महिलेला बुरखा घालून मंदिरात येण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की, ती ‘जिन्न’ च्या सांगण्यावरून बुरखा घालून मंदिरात आली आहे. हे ऐकून सर्व आश्चर्यचकित झाले.
यावेळी,संपूर्ण परिस्थिती पाहून, आणि कुटूंबियांचे म्हणणे ऐकून एका महिला पोलिसाला दर्शनासाठी तिच्यासोबत पाठवण्यात आलं. हा सर्व प्रकार पाहून आलेल्या भाविकांना धक्का बसला. मंदिरात आलेल्या महिला या साडी, सूट सलवार यामध्ये दिसतात, मात्र ही पहिली महिला आहे जीनं बुरखा घालून या मंदिरात प्रवेश केला आहे.