कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीने प्रचंड मेहनत आणि रणनीती केल्या होत्या. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विजयी झाल्या. मात्र, सध्या त्यांच्या विजयापेक्षा एका नेत्याची कोल्हापूर राजकारणात प्रचंड चर्चा होत आहे.
जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापूर राजकारणात ज्या नेत्याची अधिक चर्चा होऊ लागली आहे, तो नेता आहे सतेज उर्फ बंटी पाटील. जयश्री जाधव या विजयी झाल्यामुळे बंटी पाटील यांना कोल्हापुरातल्या राजकारणाची नस सापडल्याचे मत राजकीय विश्लेषक करत आहेत.
जयश्री जाधव यांची कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, त्यांच्या लढतीसाठी खरी फिल्डींग लावणारे म्हणजेच बंटी पाटील आहेत. या कारणामुळे त्यांच्या राजकीय खेळीबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
राजकीय विश्लेषक यांच्या मते, कोल्हापूर जिल्ह्यात केडीसीची निवडणूक असो किंवा गोकुळ दूध संघाची त्यामध्ये बंटी पाटलांनी लक्ष दिले की, ती निवडणूक बंटी पाटील आपल्याच खिशात घालणार हे नक्की असते. या निवडणुकीत तेच झालं. त्यामुळे या निकालानंतर कोल्हापूर राजकारणात बंटी पाटील यांची चर्चा होत आहे.
या निवडणुकीत भाजपनंही आपले सगळे डाव वापरून बघितले. अगदी ईडीच्यी भीतीही घातली गेली. मात्र ठोश्यास ठोसा या उक्तीप्रमाणे बंटी पाटील यांनीही कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसाठी मेहनत घेतली, आणि कोल्हापुरचे राजकीय मैदान मारले. त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव विजयी झाल्या असल्या तरी खरी चर्चा ही बंटी पाटील यांचीच होत आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी जेव्हा काँग्रेसच्या सत्तर वर्षाचा हिशोब सतेज पाटील यांच्याकडे मागितला होता, त्यावेळी थोडाही वेळ न दवडता बंटी यांनी पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचे आव्हान स्वीकारले होते. त्यामुळेही कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर बंटी पाटील यांनी जयश्री जाधव यांना जिंकवत सत्तर वर्षांचा हिशोब दिलाच .