दादा भुसे यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातला राडा; ‘५० खोके एकदम ओके’ म्हणत दाखवले काळे झेंडे

मंत्री दादा भुसे आज विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र दादा भुसे यांच्या पहिल्याच दौऱ्यादरम्यान, शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त केला आहे. यावेळी आक्रमक झालेले आंदोलक शेतकरी दादा भुसेंचे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते.

साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही, कांद्याला भाव मिळत नाही, यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ‘५० खोके… मंत्री ओके’ अशा जोरदार घोषणा दिल्या. शिवाय काळे झेंडे दाखवत आपला रोष व्यक्त केला.

राज्यासह धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. दुसरीकडे त्यांना मदत करण्याऐवजी नवनिर्वाचित मंत्री महोदय आपल्या स्वतःच्या वैयक्तिक कामात व्यग्र आहेत.

मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही, त्यांना सामान्य नागरिकांच्या प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही, शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान पाहता त्यांना मदत होणे अपेक्षित आहे. मात्र तशी मदत होताना दिसत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

यावेळी, मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या आंदोलक शेतकरी मंत्री दादा भुसे यांचे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यानंतर, पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, नाशिकसह धुळे नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांची पिके खराब झाली आहेत. अशावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने साक्री धुळे दौरा करावी अशी मागणी तेथील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी कोणतं पाऊल उचलणार पाहावं लागेल.