मंदसौर येथील पशुपतिनाथ मंदिरामध्ये सहस्रेश्वर महादेव शिवलिंग स्थापन करण्यात आले. हे शिवलिंग सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे. ते पाणी वाहून नेणाऱ्या पिंडीवर बसवण्यात आलं. ही पिंड साडेतीन टन असून, त्यात अडीच टन सहस्रेश्वर शिवलिंगाची स्थापना करणे सोपे नव्हते. अतिप्राचीन शिवलिंगाचे नुकसान होण्याचा धोका होता. अशा परिस्थितीत जेव्हा अभियंत्यांनी देखील हार मानली, तेव्हा एका अशिक्षिताने त्याची सहज स्थापना केली.
या अशिक्षित व्यक्तींचे नाव मकबूल अन्सारी आहे. त्याने सांगितलेले तंत्र कामी आले आणि अडीच टनाचे शिवलिंग पाणी वाहून नेणाऱ्या पिंडीत सहज स्थापित झाले. त्याच्या या युक्तीमुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. आधिकारी, अभियंता यांना जे जमू शकलं नाही त्यानं ते एका मिनिटात करून दाखवलं.
मकबूल हा मंदसौरच्या खानपुरा येथील रहिवासी आहे. अडीच टनाचे शिवलिंग कसे बसवायचे याबाबत स्थापत्य विभागाचे अभियंते, पीडब्लूडीचे अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. क्रेनच्या मदतीने शिवलिंग होलमध्ये बसवण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, ते कसे स्थापन करावं याबाबत चर्चा चालली होती.
ही चर्चा जवळच काम करत असलेला मकबूल ऐकत होता. त्याने जिल्ह्याधिकाऱ्यांना पडलेल्या प्रश्नाबाबत मार्ग सांगितला. त्याने जो उपाय सांगितला त्यावर सारे चकीत झाले. एका मिनिटात त्याने सर्वांना पडलेल्या समस्येचे उत्तर शोधले होते. त्यामुळे सर्वजण त्याचं कौतुक करू लागले.
मकबूल ने सांगितले की, जिथे शिवलिंग स्थापित करायचे आहे, त्या जागी बर्फ ठेवा,आणि त्यावर शिवलिंग ठेवा. बर्फ जसा जसा वितळत जाईल. तसे शिवलिंग पिंडीच्या आतमध्ये सरकत जाईल. यामुळे ना शिवलिंगाला हानी पोहोचेल ना पिंडाला. हे ऐकून सारे आवक झाले, आणि लगेच कामाला लागले.
मकबूल हा मंदिरातच कारागीर म्हणून काम करतो. तो कधीच शाळेत गेलेला नव्हता. ज्या दिवशी मंदिरात शिवलिंग बसवण्याचे काम चालू होते तेव्हा तो तिथे त्याचे काम करत होता. त्याचा शर्ट पूर्ण रंगाने,सिमेंटने भरलेला होता. मात्र, जेव्हा त्याने अधिकाऱ्यांची समस्या एका मिनिटात सोडवली तेव्हा सर्वांपेक्षा तो अधिक बुद्धीमान ठरला.