मागील चार दिवसांपूर्वी हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तो खरा ठरला आहे. यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अवकाळी पावसाने शेतकरी संकटात अडकला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास निफाड आणि येवला परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला. अर्धातास पडलेल्या या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा तर मिळाला, मात्र शेतातील उभ्या पिकांना याचा फटका बसला.
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि द्राक्ष या पिकांचे नुकसान झाले. रात्री उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना रात्री वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपलं, त्यामुळे या ठिकाणच्या द्राक्ष, गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये वादळी वा-यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. औरंगाबादमध्येही मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल तसंच काही भागात गारपीटही होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने आज पुण्यासह 18 जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
पुढील 48 तासात धुळे नंदुरबार जळगाव नाशिक मेघगर्जनेसह वादळी वारा गारपिटीची शक्यता आहे. तर औरंगाबाद, जालन्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नाशिक जळगाव धुळे नंदुरबार औरंगाबाद आणि जालनात आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.






