Share

‘मी माफी मागायला तयार, हा विषय आता संपवा’; सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर बंडातात्या अखेर नरमले

कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महाविकास आघाडीच्या वाइन धोरणाबाबत बोलताना खळबळजनक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारू पितात, असं वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. अखेर बंडातात्या कराडकर यांना माफी मागावी लागली.

वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर राज्यभरात खळबळ उडाली. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती.

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच वादात सापडले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वादंग निर्माण झालं आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांना अखेर माफी मागावी लागली.

माफी मागताना कराडकर म्हटले की, ‘ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केलं. पत्रकारांनी आता विषय वाढवू नये,’ असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत आयोगास सादर करावा. तसंच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा,’ अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या होत्या.

तर खासदार नवनीत राणा यांनीही बंडातात्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता, त्या म्हणाल्या होत्या आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. पण बंडातात्या कराडकर यांचे महिलांबाबतचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा राणा यांनी दिला होता.

राजकारण

Join WhatsApp

Join Now