अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आता दिवाळीनिमित्त आपल्या मतदारसंघातील गरीब कुटूंबांना मोफत किराणा वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. यावरून आता आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे.
अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली. ‘महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा मागणारे असे राणा दाम्पत्य’ अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, काही ठिकाणी मतं मिळवण्यासाठी नेत्यांना रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिसे कापणारे आणि मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असे म्हणत राणा दाम्पत्यावर टीका केली.
तसेच म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र, आपण या अधिकाराचं पतन करत पुन्हा किराणा देणाऱ्याला निवडून देतो. गोरगरीबांचे खिसे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची, असले नेते आपल्यात कमी नाहीत.
बच्चू कडू म्हणाले, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो,असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी यावेळी अप्रत्यक्ष राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिवाळीनिमित्त मतदारसंघातील गरीब कुटूंबांना मोफत किराणा वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास एक लाख लोकांना किराण्याचे वाटप केले जाणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले आहे.