Share

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्यायचे असेल तर निम्मे पैसे द्या; दानवेंची मागणी

नामकरणावरून होणारा वाद राजकारणात नवीन नाही. एखादे स्मारक, रेल्वे स्टेशन, किंवा मैदान असो प्रत्येक ठिकाणी नावावरून राज्य आणि केंद्र यांच्यात वाद प्रतिवाद होताना दिसतो. आता समृद्धी महामार्गाच्या नावावरून एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या वादाला सुरुवात केली आहे.

मनमाड ते मुदखेड रेल्वेच्या विद्युतीकरणाचं उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालन्यात आले होते. यावेळी उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरून वक्तव्य केले. म्हणाले, समृद्धी महामार्गाला आम्ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देणार होतो. परंतु, आता राज्य सरकार बाळासाहेब ठाकरे यांच नाव देत आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं असेल तर राज्याला पन्नास टक्के पैसे द्यावे लागतील. असे ते म्हणाले.

तसेच म्हणाले, यापुढे कोणत्याही रेल्वे प्रकल्पासाठी राज्याला पन्नास टक्के पैसे द्यावे लागतील. राज्यातील रेल्वे प्रकल्पाला पैसे दिले तरच प्रकल्प होतील असे मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता पुन्हा एकदा राज्य विरोधी केंद्र या नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या उद्घाटन कार्यक्रमाला काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी, जालना नगरपालिकेत हातात कमळ राहील, अशा घोषणा देखील केल्या. गोरंट्याल यांनी मंत्री दानवे यांच्यासमोर अशा घोषणा दिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री भागवत कराड यांनी आमदार गोरंट्याल यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

गोरंट्याल यांनी यावेळी आगामी नगरपालिकेत आपल्या हातात कमळ राहणार असल्याचे सांगत भविष्यात नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आले. यावेळी व्यासपिठावर मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड यांची उपस्थिती होती.

गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका करत रावसाहेब दानवे यांचे कौतुक केले. त्यामुळे आता यापुढे जालन्यातील राजकीय समीकरण नेमकं कसं राहील, आणि समृद्धी महामार्गाला नेमकं कोणाचं नाव देण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now