Share

तुम्हाला वाटतय कश्मीर फाईल्स लोकांनी पहावा तर युट्यूबवर टाका, लोकांना फूकट पाहता येईल

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. हा चित्रपट अनेक राज्यात करमुक्त करण्यात आला आहे. दिल्लीत देखील भाजपकडून हा चित्रपट करमुक्त केला जावा अशी मागणी करण्यात आली. त्यावरून, विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी भाजपने केली. त्यावर आता विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना केजरीवाल यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. म्हणाले, ‘काश्मीर फाईल्स ‘ चित्रपट तुम्ही करमुक्त करण्याची मागणी का करत आहात? तुम्हांला एवढंच वाटत असेल तर विवेक अग्निहोत्रींना सांगा, हा चित्रपट युट्युबवर टाकायला.

हा चित्रपट जर त्यांनी युट्युबवर टाकला तर सर्वच लोकांना फुकट पाहता येईल. त्यासाठी करमुक्त करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न केजरीवाल यांनी करत भाजपला कोंडीत पकडलं. तसेच म्हणाले, काश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे आणि भाजप कार्यकर्त्यांना चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम दिलं आहे.

केजरीवाल यांनी यावेळी भाजप आमदारांना ‘आप’ मध्ये सामील होण्याचं आवाहन केलं, आणि म्हणाले, तुम्ही आमच्या पक्षात या, तुम्हाला ‘काश्मीर फाईल्स’सारख्या खोट्या चित्रपटाचे पोस्टर लावण्याचे काम न देता चांगलं काम देऊ. जनतेच्या भल्यासाठीचं काम देऊ. चित्रपटाच्या प्रमोशनचं काम आम्ही तुम्हाला देणार नाही.

केजरीवाल यांनी भाजपला दिलेल्या या सडेतोड उत्तरामुळे भाजप आता पुढे कोणतं पाऊल उचलेल पाहावं लागेल. दरम्यान, केजरीवाल यांनी भाजपला दिलेल्या उत्तरांचे काहींनी कौतुक केले आहे तर काहींनी उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तिथे हा चित्रपट करमुक्त आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कहाणी सांगण्यात आली आहे. मात्र, चित्रपटात दाखवण्यात आलेली कहाणी ही अर्ध सत्य आहे. त्यावेळी फक्त काश्मिरी पंडितांवरच नव्हे तर मुस्लिमांवर देखील अत्याचार झाले, पण ते दाखवण्यात आले नाही याबद्दल चर्चा होत आहे.

राजकारण बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now