Share

Amit shah : तुम्ही आम्हाला जमीन दाखवायचा प्रयत्न केला तर आम्ही…; अंगावर आलेल्या शहांनाच ठाकरेंनी घेतले शिंगावर

मुंबईतील नेस्को मैदानावर काल गटनेत्यांचा मेळावा पार पडला, यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. उद्धव ठाकरेंनी काल भाजप-शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील निशाणा साधला.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी नेस्को मैदानात भाषण करत तुफान टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. एवढेच नाही तर, त्यांनी आपल्या ठाकरी शैलीत अमित शाह यांनाही आव्हान दिलं.

मध्यंतरी अमित शहा यांनी मुंबई दौरा केला, यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. म्हणाले, मुंबईवर गिधाडं फिरू लागली आहेत. लचके तोडणारी अवलाद आहे ती गिधाडांची. ती गिधाडं फिरू लागली आहेत. मुंबई बळकावयची आहे, मुंबई गिळायची आहे. हे काही आजचं नवीन नाही.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचून मोठे झालो आहोत. त्यावेळी अनेक आदिलशाह, निजामशाह चालून आले होते. त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शाह मुंबईत येऊन गेले. काय बोलले? शिवसेनेला जमीन दाखवा.

पण, त्यांना माहित नाही इथे समोर बसलेली गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवायचा प्रयत्न कराच तुम्हाला आम्ही आस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत ठाकरे यांनी अमित शहा यांना टोला लगावला.

तसेच यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांना एक आव्हान देखील केलं. ठाकरे म्हणाले, ‘हिंमत असेल तर पुढच्या महिन्याभरात मुंबई महापालिका आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा.’ ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील सडकून टीका केली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now