महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमादरम्यान भाषण केले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आत युवासेना आक्रमक झाली असून, त्यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.
तानाजी सावंत म्हणाले होते,’उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगतो, गद्दारी तुम्ही केली, दिल्लीला गेले असते तर सत्ता टिकली असती,’ अशा भाषेत सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. सावंत यांच्या या विधानावरून युवासेना आता आक्रमक झाली आहे.
युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना प्रतिउत्तर दिलं आहे. शरद कोळी म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगणाऱ्यांना ठेचून काढू’ तसेच म्हणाले, शिंदे गटातील मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तोंड सांभाळून बोलावे.
सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते. पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये असा इशारा शरद कोळी यांनी दिला. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. म्हणाले, शिवाजी महाराज कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत.
शिवाजी महाराजांना मुघलांकडून अनेकदा बोलावणे आलं होतं. पण शिवाजी महाराज महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. उद्धव ठाकरे देखील झुकणार नाहीत, असे म्हणत शरद कोळी यांनी शिंदे गटाला ठणकावून इशारा दिला.
दरम्यान, तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सावंत यांनी त्या विधानावर माफी मागितली असली तरी, विरोधक सावंत आणि शिंदे गटावर टीका करताना दिसत आहेत.